अहमदनगर

अहमदनगर बनेल उत्तर-दक्षिणला जोडणारा केंद्रबिंदू; नगर – सोलापूर महामार्गाचे काम जोमात

अमृता चौगुले

रुईछत्तीशी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर – सोलापूर महामार्गाचे काम जोरात सुरू असून, पुलांचे काम अंतिम टप्प्यात आहे. दिड वर्षांपासून या मार्गाचे काम चालू असल्याने काम दर्जेदार सुरू आहे. या महामार्गाने उत्तर भारत दक्षिण भारताशी जोडला जाणार आहे. कोणत्याही प्रकारचा घाटमार्ग नसल्याने अवजड वाहनांची सर्वाधिक गर्दी या मार्गावरून जाते. आगामी 2024 साली या मार्गाचे लोकार्पण होणार आहे. जिल्ह्यातील नगर ते घोगरगाव 39 किमी व घोगरगाव ते माहिजळगाव 41 किमी, अशा 80 किमीचे काम दोन टप्प्यात पूर्णत्वाकडे जात आहे. छोट्या मोठ्या पुलंची कामे चालू आहेत.

रस्ते महामार्ग प्रशासन अधिकार्‍यांची पाहणी सातत्याने चालू आहे. आगामी लोकसभेच्या मुहूर्तावर या मार्गाचे लोकार्पण होणार असल्याने खासदार डॉ. सुजय विखे यांनी या मार्गाच्या पाहणी केली आहे. गुजरात राज्यातील औद्योगिक वस्तू नगरमार्गे सोलापूरवरून दक्षिणेकडे रवाना होतील. तर, नाशिकचे द्राक्षे अन् जळगावची केळी, धुळ्याचे तुप अन् दुग्धजन्य पदार्थ कमी वेळात दक्षिण भारतात पोहोचणार आहेत. तसेच, आंध्रप्रदेशची तंबाखू व केरळचे मसाल्याचे पदार्थ ही महाराष्ट्रात अगदी कमी वेळेत दाखल होण्यासाठी हा मार्ग सुकर बनला आहे.

देवस्थाने येणार प्रकाशझोतात

पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर ही देवस्थाने प्रकाश झोतात येणार आहेत. तसेच, पुढील वर्षीची आषाढीची वारी सुलभ पद्धतीने मार्गक्रमण करणार आहे. यावेळी मार्गाचे काम चालू असल्याने वारकर्‍यांना थोडा त्रास सहन करावा लागला. एकंदरीत नगर – सोलापूर महामार्गावर नगर व सोलापूर या जिल्ह्यांची देवाण-घेवाण अजून सुलभ होईल. बाह्यवळण रस्त्यामुळे या मार्गावर येणार्‍या मोठ्या गावांची कोंडी कमी होण्यास मदत होईल.

2024 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते या मार्गाचे लोकार्पण होईल. या महामार्गाने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विकासाची कामधेनू पोहोचली आहे. नगर शहर उत्तर भारत आणि दक्षिण भारतांना जोडणारे प्रमुख केंद्रबिंदू बनले आहे.

-डॉ. सुजय विखे, खासदार, नगर

हेही वाचा

SCROLL FOR NEXT