अहमदनगर

अहमदनगर प्रेस क्लबच्या चौकशीची मागणी; पत्रकारांनी एकत्रित केला ठराव

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर प्रेस क्लब या संघटनेची नुकतीच जाहीर केलेली कार्यकारिणी अवैध आहे. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाने हस्तक्षेप करत या संघटनेची चौकशी करून संस्थेच्या बँक खात्यात अनधिकृतपणे झालेल्या व्यवहाराची चौकशी करून विश्वस्त निवडीची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी अहमदनगर येथील मुख्य प्रवाहातील संपादक व पत्रकारांनी सामुदायिकपणे केली आहे. तोपर्यंत नवीन संघटनेची स्थापना करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

अहमदनगर शहरातील मुख्य प्रवाहातील दैनिके, सायंदैनिके यांचे संपादक व पत्रकार, वृत्तपत्र छायाचित्रकार, साप्ताहिकांचे संपादक, अधिकृत वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी यांची एकत्रित व्यापक बैठक बुधवारी झाली. बैठकीत प्रामुख्याने अहमदनगर प्रेस क्लब या संघटनेबाबत चर्चा झाली. 1992 साली ही संघटना सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणी केली.

मात्र, पहिल्या कार्यकारी मंडळानंतर कोणत्याही कार्यकारिणीने आपला बदल अर्जच आजवर सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदविला नाही. शिवाजी शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली 2018 साली झालेल्या कार्यकारिणीने न्यास नोंदणी कार्यालयात रीतसर बदल अर्ज दाखल केला. मात्र, त्यास दोघांनी हरकत घेतल्याने तोही प्रलंबित आहे.

त्यामुळे या संघटनेच्या खात्यात असलेल्या निधीचा संघटनेला वापर करता येत नाही. तसेच अधिकृत निवडणूकही घेता येत नाही. असे असताना गत आठवड्यात काहीजणांनी संघटनेची नवीन कार्यकारिणी घोषित केली. ही कार्यकारिणी बेकायदा असून संस्थेचे बँंक खातेही आजवर बेकायदेशीरपणेच वापरण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे या सर्व बाबींची चौकशी करण्याची मागणी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडे करण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला.

प्रेस क्लब या संघटनेबाबत कायदेशीर पेच असल्याने त्याबाबत कायदेशीर लढाई केली जाणार आहे. तोपर्यंत पत्रकारांच्या सोयीसाठी नगर शहरात नवीन संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संघटनेची लवकरच घोषणा केली जाणार आहे. बैठकीला पत्रकार शिवाजी शिर्के, सुधीर लंके, प्रकाश पाटील, अनंत पाटील, राजेंद्र झोंड, संदीप रोडे, भागा वरखडे, ललित गुंदेचा, मोहिनीराज लहाडे, सुरेश वाडेकर, दिलीप वाघमारे, मिलिंद देखणे, अशोक झोटिंग, मनोज मोतीयानी, शिरीष कुलकर्णी, निशांत दातीर, रमेश देशपांडे, गजेंद्र राशिनकर, राम नळकांडे, फैय्याज शेख, आदिल रिजाय शेख, सुशील थोरात, साहेबराव कोकणे, उमेर सय्यद, संतोष आवारे, कुणाल जायकर, दत्ता इंगळे यांसह 84 पत्रकार उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT