अहमदनगर

Ahmednagar News : पोहण्याचा मोह ठरला जीवघेणा; वाढदिवसाला आलेल्या १७ वर्षीय पाहुण्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

जामखेडच्या धानोरा येथील हृदयद्रावक घटना

पुढारी वृत्तसेवा

जामखेड : जामखेड तालुक्यातील धानोरा येथे नातेवाईकांकडे आलेल्या १७ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. ५) सकाळी घडली. आवेज रिजवान पठाण (वय १७, रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर) असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आवेज हा ४ फेब्रुवारी रोजी मामेबहीणीच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त धानोरा येथे आला होता. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर तो आपल्या चुलत भावासह नातेवाईकांकडे मुक्कामी थांबला होता. गुरुवारी (दि. ५) सकाळी सुमारे आठच्या सुमारास आवेज हा चुलत भाऊ अन्वर शौकत पठाण व मित्र जय संतोष आरू यांच्यासोबत घराजवळील विहिरीवर पोहण्यासाठी गेला.

अन्वर व जय यांनी विहिरीत पोहून वर येताच आवेजनेही ‘मलाही पोहता येते’ असे सांगून विहिरीत उडी मारली. मात्र उडी मारल्यानंतर तो पाण्यावर वर आला नाही.

यामुळे घाबरलेल्या दोघांनी आरडाओरड केली. आवाज ऐकून वस्तीवरील नातेवाईकांनी धाव घेतली. घटनेची माहिती पोलीस पाटील योगिनाथ जायभाय यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ जामखेड पोलीस ठाणे व महसूल विभागाला कळवले.

दरम्यान, पिंपरखेड येथील रफीक अब्बास सय्यद (वय ५४) यांनी सुमारे २३ फूट खोल पाण्यात बुडी मारून आवेजचा मृतदेह वर काढला. सकाळी आठ वाजता घडलेल्या या घटनेनंतर सुमारे सहा तासांच्या प्रयत्नांनंतर दुपारी तीनच्या सुमारास दोरीच्या सहाय्याने मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला.

मृतदेह बाहेर काढण्यासाठी वाजिद पठाण, हरीदास शिरगिरे, माजी सरपंच बालाजी शिंदे, भाऊराव काळे, लाला शिंदे, बाबुराव वाघ, सिकंदर शेख, सलीम शेख आदींनी मदत केली. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक पुष्कर कडू, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र सरोदे, योगेश दळवी, मंडल अधिकारी विजय चव्हाण व पोलीस पाटील योगिनाथ जायभाय उपस्थित होते. पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT