अहमदनगर

राज्यातील कृषी विद्यापीठांचा जगात अभिमान : कृषीमंत्री सत्तार

अमृता चौगुले

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : देशातच नव्हे तर जगालाही हेवा वाटेल असे कार्य आपल्या राज्यातील कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांकडून शेती संशोधनात होत आहे. युद्धात विरोधी सैन्याशी लढणार्‍या शूर सैनिकांप्रमाणेच शास्त्रज्ञ असंख्य आव्हानांना तोंड देत शेतकर्‍यांसाठी विविध वाण निर्माण करीत आहेत. बदलत्या काळानुसार वाढलेले प्रदुषण, दुषित हवा, पाणी व खालावलेली जमिनीची मात्रा पाहता विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी नविन आव्हाणांचा सामना करीत समस्यांवर तोडगा शोधावा, असे आवाहन कृषी मंत्री तथा म.फु.कृ. विद्यापीठाचे प्रतिकुलपती अब्दूल सत्तार यांनी केले.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे व म. फुले कृषी विद्यापिठाच्या संयुक्त विद्यमाने राहुरी कृषी विद्यापिठात तीन दिवसीय संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या 51 व्या बैठकीच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन मंत्री सत्तार बोलत होते. प्रमुख पाहुणे पोकराचे प्रकल्प संचालक डॉ. परिमल सिंग उपस्थित होते. स्वागताध्यक्ष म. फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील होते.

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्थेचे संचालक डॉ. आर. ए. मराठे, तीनही विद्यापीठांचे कुलगुरु डॉ. संजय सावंत (दापोली), डॉ. इंद्र मणी (परभणी), डॉ. शरद गडाख (अकोला), कार्यकारी परिषद सदस्य गणेश शिंदे, दत्तात्रय उगले, महाबीजचे कार्यकारी संचालक सचिन कलंत्री, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, डॉ. संजय भावे, डॉ. दत्तप्रसाद वासकर, कृषी परिषदेचे संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, अधिष्ठाता डॉ. बापुसाहेब भाकरे, कुल सचिव प्रमोद लहाळे, कराड कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे व कुलगुरुंचे विशेष कार्याधिकारी डॉ. महानंद माने उपस्थित होते.

कृषी मंत्री सत्तार म्हणाले, राज्यातील चारही कृषी विद्यापिठांनी अधिक बियाणे निर्मिती केल्याने शेतकर्‍यांना अडचण भासणार नाही. सध्या शेतीमध्ये जमीन धारणा क्षेत्र घटत असल्यामुळे शेतकर्‍यांना ड्रोन वापरताना अडचणी येऊ शकतात. यावर शेतकर्‍यांनी गट शेतीच्या माध्यमातून पर्याय शोधला पाहिजे. विद्यापिठांनी कमी खर्चामध्ये ड्रोन तयार केल्यास छोट्या शेतकर्‍यांना तो वापरता येईल.

त्यामुळे खतांबरोबरचं औषध फवारणी केल्यामुळे शेतकर्‍यांचा आर्थिक फायदा होईल, असे सांगत, कृषी विद्यापीठे परदेशातील विद्यापिठांसह संस्थांबरोबर करीत असलेल्या सामंजस्य करारांमुळे संपूर्ण देशासह परदेशातील विद्यापिठांनाही दिशा देण्याचे काम महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे करीत आहेत, असे स्पष्ट करुन, कृषी विद्यापीठे ही पवित्र मंदिरे असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते 'जॉईंट अ‍ॅग्रेस्को-2023' च्या स्मरणीकेचे आणि चारही कृषी विद्यापीठांच्या प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी चारही कृषी विद्यापिठांच्या तंत्रज्ञानांचे प्रदर्शनाचे मोठे दालन उभे करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन कृषी मंत्र्यांच्या हस्ते झाले.
यावेळी चार शास्त्रज्ञांना उत्कृष्ट शास्त्रज्ञ पुरस्कार कृषी मंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. म. फुले कृषी विद्यापीठाचे वनस्पती शास्त्रचे प्रा. डॉ. पवन कुलवाल, अकोला कृषी विद्यापीठाचे डॉ. रामेश्वर कुर्‍हाडे, परभणी कृषी विद्यापीठातील डॉ. दीपक पाटील व दापोली कृषी विद्यापीठाच्या डॉ. भरत वाघमोडे यांचा समावेश होता.

यावेळी सेंद्रिय शेती प्रकल्प, जैविक खत प्रकल्प व ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन कृषी मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी कुलगुरु डॉ. पाटील म्हणाले, चारही कृषी विद्यापिठांतील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनांचे सादरीकरण, मुल्यमापन या बैठकीमध्ये होत आहे. अशा प्रकारची बैठक देशामध्ये फक्त महाराष्ट्रात होत असल्याचे ते म्हणाले. डॉ. परिमल सिंग यांचे भाषण झाले. स्वागत डॉ. सुनिल गोरंटीवार, सूत्रसंचालन डॉ. आनंद सोळंके तर आभार डॉ. हरिहर कौसडीकर यांनी मानले.

संशोधनासाठी 100 कोटी अनुदानाची घोषणा

महात्मा फुले कृषी विद्यापिठात कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी कृषी शा स्त्रज्ञांवर चौफेर स्तूती सुमनांची उधळण केली. यानंतर राज्यातील चारही कृषि विद्यापीठांना संशोधनासाठी 100 कोटी रुपयांचे अनुदान वितरीत केले असल्याचे सांगत संशोधन हे शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन मंत्री सत्तार यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT