अकोले: अग्निपथ योजनेंतर्गत देशाच्या सैन्यदलामध्ये कंत्राटी सैनिक भरती करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा व अखिल भारतीय किसान सभेने येत्या 24 जून रोजी देशभर तीव्र आंदोलन करण्याची हाक दिली आहे.
अग्निपथ योजनेंतर्गत तरुणांना केवळ चार वर्षांसाठी सैन्यात भरती करून घेतले जाणार आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर यापैकी 75 टक्के युवक-युवतींना सैन्यदलातून काढले जाणार आहे. अग्निपथ योजनेंतर्गत सैन्यात घेतलेल्या युवक-युवतींना केवळ अडीच महिने ते सहा महिन्यांचे तोकडे प्रशिक्षण मिळणार आहे. देशाच्या सुरक्षेशी खेळ करण्याचा हा प्रकार आहे.
सैन्यदलाच्या गुणवत्तेशी व कार्यक्षमतेशी करण्यात येत असलेला हा खेळ देशाची सुरक्षितता धोक्यात आणणारा आहे. निवृत्ती वेतनाचे पैसे वाचावे यासाठी देशाच्या सुरक्षिततेबाबत अशी जोखीम घेणे समर्थनीय नाही. चार वर्षांत निवृत्त होऊन नागरी आयुष्यात परतणार्या युवक-युवतींना अशा अकाली निवृत्तीनंतर बेरोजगार व्हावे लागणार असल्याने जटिल प्रश्न निर्माण होणार आहेत. जनतेच्या लष्करीकरणाचा आपला छुपा अजेंडा संघ परिवार या माध्यमातून पुढे नेत आहे. सैन्यदलात मेडिकल व डेंटल पदांसह तब्बल 1 लाख 45 हजार 327 पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर अग्निपथ योजनेंतर्गत केवळ 46 हजार पदे भरली जाणार आहेत. कंत्राटी पद्धतीने केवळ चार वर्षांसाठी ती भरली जाणार आहेत.
अग्निपथ योजनेची पहिली भरती 24 जून रोजी सुरू होत असल्याने याच दिवशी देशभर आंदोलन करून या योजनेचा निषेध करण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने घेतला आहे. तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करून या योजनेचा निषेध करणारी निवेदने राज्यभरात तहसीलदारांना दिली जाणार आहेत. अग्निपथ योजनेचा देशातील शेतकरी, युवक, विद्यार्थी व जनतेने तीव्र निषेध करावा. या आंदोलनात सक्रिय व्हावे, असे आवाहन किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख व डॉ. अजित नवले यांनी केले आहे.