अहमदनगर

Nagar News : गावतळे भरण्यासाठी शेतकरी आक्रमक!

अमृता चौगुले

पुणतांबा : पुढारी वृत्तसेवा :  ओव्हरफ्लोच्या पाण्यामध्ये गावातील कोरडे पडलेले गावतळे भरून मिळावे, या मागणीसाठी चितळी उजवा तट कालव्या अंतर्गत लाभधारक शेतकर्‍यांनी चितळी पाटबंधारे विभागाच्या शाखा कार्यालयासमोर एकजुटीने ठाण मांडले. टेलला पाणी पोहोचलेच पाहिजे, शेतकर्‍यांना हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे' अशा घोषणा देत शेतकरी बांधवांसह सर्वपक्षीयांनी आंदोलन केले.
शेतकर्‍यांनी पाटबंधारे विभागास निवेदन दिले. यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. चितळी, जळगाव, निमगाव खैरी, गोंडेगाव, वाकडी, एलमवाडी परिसरात गावतळे पुर्णतः कोरडे पडले. यामुळे पशुधन वाचविण्याचा गंभीर प्रश्न शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे. याप्रश्नी टेल परिसरातील शेतकर्‍यांनी अनेक आंदोलने करुनदेखील प्रशासनाने पुर्णतः दुर्लक्ष केले. प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात शेतकरी व ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केल्याशिवाय अधिकारी व प्रशासनाला जाग येणार नाही. ही मागणी अमान्य केल्यास ग्रामस्थ व शेतकरी आज (दि.3) ऑक्टोबर रोजी सकाळी निमगावखैरी मार्गावर रास्तारोको आंदोलन करतील, असा इशारा संतप्त शेतकर्‍यांनी पाटबंधारे विभागास दिला.

पाण्यासाठी शेतकर्‍यांची अडवणूक करू नका..!
माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी शेतकर्‍यांच्या पाणी प्रश्नाची दखल घेत
चितळी येथील उजवा तट पाटबंधारे अधिकार्‍यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. पाट पाणी शेतकर्‍यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. शेतकर्‍यांची पाण्यावाचून अडवणूक करू नका. त्यांना वेठीस न धरता कुठलेही राजकारण न करता पाटबंधारेने त्वरित पाणी द्यावे, अशा सुचना केल्या.

मागण्या पूर्ण न केल्यास आज रास्ता रोको..!
दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने विहिरी, कुपनलिका आदी पाण्याचे स्त्रोत कोरडे पडले. पाऊस कमी प्रमाणात पडला. पशुधन वाचविण्यासाठी चारा पिकांसाठी गावतळे भरावे. या मागण्या येत्या मान्य न केल्यास आज (दि.3 ऑक्टोबर) रोजी निमगाव खैरी येथे सर्वपक्षीयांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा आक्रमक इशारा पाटबंधारे विभागाला भारतीय किसान संघाने दिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT