अहमदनगर

नगर : बारागाव नांदूरात जावयाची काढली मिरवणूक

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : बारागाव नांदूर ग्रामस्थांनी यंदा जावयांची गाढवावरून धिंडीची प्रथा बंद केल्याचे घोषित केल्याने सुटकेचा निःश्वास टाकलेले जावई बापू अखेर मित्रांच्या जाळ्यात अलगद अडकले. गावातून हुकले, परंतु धरण तटाला सापडलेले जावई यांची गाढवावरून वाजत गाजत निघालेल्या मिरवणुकीने सासर्‍यांच्या दारात आल्यानंतर विसावा घेतला. कोरोना कालखंडानंतर बारागाव नांदूर ग्रामस्थांनी गावात जावयांची धिंड प्रथेला फाटा दिला होता. त्यामुळे गावातील शिवाजी चौकामध्ये सर्व धर्मिय तरुणांनी एकत्र येत यंदा जावयांची धिंड न काढता डिजेच्या तालामध्ये रंगांच्या उधळणीचा आनंद लुटण्याचा निर्णय घेतला. जावई बापुंनी प्रथा बंद झाल्याने सुटकेचा निःश्वास टाकला.

सरकारी कार्यालयात कार्यरत असलेले जावई हे बारागाव नांदूर येथील वाघ यांचे जावई आहेत. ते बारागाव नांदूर येथे मुळा धरणाच्या तटालगत राहतात. गावातील प्रथा थांबल्याने कांदळकर हे घरीच निश्चिंत होते. कांदळकर यांना त्यांच्या मित्रांनी जेवणाचे आमंत्रण धाडले. त्यानंतर कांदळकर हे ठरलेल्या ठिकाणी हजर झाले. त्या ठिकाणी मित्रांनी सर्व तयारी करून ठेवलेली होती. कांदळकर यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढली. मिरवणूक सासर्‍यांच्या घरी आल्यानंतर सासरे बुवांनी जावयाचा मानपान व सन्मान दिला. जावई बापुला नवीन कपडे, पंचपक्वान्न देत मानपान देण्यात आला.

गावाने थांबवली होती प्रथा
स्व. मा.आ. काशिनाथ पवार, स्व. सर्जेराव गाडे, स्व. मच्छिंद्र गाडे यांच्यानंतर स्व. बापुराव गाडे, स्व. शिवाजीराजे गाडे यांनी गावात जावई बापू धिंड प्रथा जपली. परंतु गेल्या चार वर्षांपासून गावात धिंड प्रथा बंद पडली. यंदाही गावात धिंड प्रथा होणार नव्हती. परंतु जावयांचे मित्र व नातलगांनी हट्ट पूर्ण करीत जावयांची मिरवणूक काढलीच.

SCROLL FOR NEXT