नगर : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील दूध दर व दूध भेसळ प्रश्नाबाबत पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील दुधात होणार्या भेसळीला पायबंद घालण्यासाठी 1 सप्टेबरपासून धडक मोहीम हाती घेण्यात आली असून, आजअखेर जिल्ह्यातील विविध तालुक्यांत घातलेल्या छाप्यामध्ये सुमारे 4 लाख रुपये किंमतीचे कमी गुणप्रतीचे दूध व दुग्धजन्य पदार्थ नष्ट करण्यात आले. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या सूचनेनुसार, तसेच अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय नारागुडे, समिती सदस्य अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त प्रमोद काकडे व मनिष सानप, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुनील तुंबारे, वैध मापनशास्त्र उपनियंत्रक नितीन उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी धाडी घालण्यात आल्या.
या धडक मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी कमी गुणप्रत आढळून आलेले एकूण 10 हजार 658 लिटर दूध, 509 किलो दही व 19 किलो तूप नष्ट करण्यात आले. विविध तालुक्यांतील नष्ट केलेल्या या दूध व दुग्धजन्य पदार्थांची किमत सुमारे 4 लाख रुपये इतकी आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थांचे एकूण 41 नमुने पुढील तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
या समितीच्या माध्यमातून वजन मापे प्रमाणीकरण व त्रूटी संदर्भात एकूण 12 कारवाया करण्यात आल्या. या मोहिमांमध्ये अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे, प्रदीप कुटे, डॉ.प्रदीप पवार व अश्विनी पाटील, तसेच जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ.वसंत गारुडकर व तालुकास्तरीय अधिकारी सहभागी झाले होते.
भेसळ रोखण्यासाठी समिती कार्य करणार
धडक तपासणी मोहिमेद्वारे दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी ही समिती कार्य करणार असून, दूध व दुग्धजन्य पदार्थ भेसळीत सहभागी असणार्या व्यक्ती,आस्थापनांविरोधात प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) नोंदवून कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये दूध भेसळ करणार्या व्यक्तीबरोबर भेसळयुक्त दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ स्वीकारणार्या व्यक्ती, आस्थापनेससुद्धा सहआरोपी करण्यात येणार आहे.
हेही वाचा :