श्रीरामपूर/ लोणी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशिर्वादासह जनता व कार्यकर्त्यांच्या भक्कम पाठबळामुळेचं राज्यात मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. या संधीतून जनतेच्या हिताचे निर्णय आपण करीत आहोत, परंतु आपल्या निर्णयांसह परिसराच्या विकासाची काहींना असुया वाटते. यामुळेचं चांगल्या कामात अडथळे निर्माण करण्याचे काम सुरु झाले, अशी टीका करुन, यापुर्वीसुद्धा बाहेरुन आलेली आव्हानं परतवून लावण्याचे काम कार्यकर्त्यांनी संघटीतपणे केले. संघटनेची ताकद हेच आपल्या यशाचे बलस्थान असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी केले.
श्रीक्षेत्र निझर्णेश्वर येथे जनसेवा मंडळाच्या वतीने पार पडलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री विखे पा. मार्गदर्शन करताना बोलत होते. नुकत्याच झालेल्या प्रवरा सहकारी बँक, राहाता बाजार समितीचे नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पा. यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास प्रवरा बँकेचे नुतन चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे, व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे, राहाता बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती अण्णासाहेब कडू, डॉ. विखे पा. कारखान्याचे व्हा.चेअरमन विश्वासराव कडू, बापूसाहेब गुळवे, कैलासराव कोते, कैलासराव तांबे, सेवा निवृत्त सनदी अधिकारी शिवाजीराव जोंधळे, भाऊसाहेब जेजूरकर, दीपक पठारे आदी उपस्थित होते.
मंत्री विखे पा. म्हणाले, जनसेवा मंडळाच्या माध्यमातून दिवंगत खा. बाळासाहेब विखे पा. यांनी असंख्य कार्यकर्ते जोडले. विचारांवर आधारित कार्यकर्त्यांचे संघटन हेचं आपल्या यशाचे बलस्थान आहे. एका विचाराने व समन्वयाने संघटनेची सुरु असलेली वाटचाल ही प्रवरा उद्योग समुहातील सर्व संस्थांच्या प्रगतीसह राजकीय यशामध्ये प्रतिबिंबीत होत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करताना विकास कामात आपण कुठेही मागे नाही. उलट प्रत्येक निवडणुकीत दिलेला शब्द पुर्ण करणे हेच आपले ध्येय असते. निळवंडे पाण्याबाबत दिलेला शब्द पुर्ण करुन, वचनपुर्ती केल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
आपल्या भागातील युवकांसाठी रोजगार उपलब्ध करण्याचे नियोजन सुरु आहे. यासाठी शेती महामंडळाच्या जमिनींचा उपयोग करण्यासाठी शासनाने परवानगी दिली.या जमिनींवर औद्योगिक कंपन्यांसह आयटी पार्क उभारण्याचा निर्णय झाला. प्रशासकीय स्तरावर हे काम सुरु झाल्याचे स्पष्ट करुन ते म्हणाले, अनेक युवक आता प्रशासकीय सेवेत जाण्यास ईच्छुक आहेत. त्यांना मोफत प्रशिक्षण देण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने नेहमी पुढाकार घेतला. पोलिस भरतीच्या प्रशिक्षणासाठी सुध्दा मोफत सुविधा संस्थेने उपलब्ध करुन दिल्याने त्याचा अनेकांना लाभ मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशिर्वादाने राज्यात मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने जनतेच्या हिताचे निर्णय महसूल विभागाच्या माध्यमातून होत आहेत. या विभागातून यापुर्वी जे निर्णय घेतले गेले नाहीत, ते करुन सामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम सुरु आहे. कामांची व निर्णयांची तुलना आता जनता करु लागली आहे, याची असुया काहींना वाटत असल्यामुळेच आता 'पाहुणे रावळे' येवून या भागात आपल्या विकास प्रक्रीयेत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
यापुर्वीसुध्दा राज्यासह जिल्ह्यातील लोकांनी आपल्यापुढे आव्हानं निर्माण करण्याचे प्रयत्न केले, परंतु कार्यकर्त्यांच्या संघटीत शक्तीने ही आव्हानं परतवून लावल्याचा टोला पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी लगावला. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पा., व डॉ. भास्करराव खर्डे यांची भाषणे झाली. स्वागत संचालक कैलासराव तांबे तर आभार व्हा. चेअरमन विश्वासराव कडू यांनी मानले.