बोटा (नगर), पुढारी वृत्तसेवा: संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार भागात सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्रेत्यांवर दि. 16 मे रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास अन्न औषध प्रशासनाने छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत 13 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईत दोन जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकास अटक केली तर दुसरा पसार झाला आहे.
अन्न व औषध प्रशासनास गुप्त माहितीव्दारे विक्रीसाठ साठवणूक करून ठेवलेल्या अवैध गुटका दुकांनाची व घराची माहिती मिळाली. माहितीनुसार मंगळवारी दुपारी कर्जुले पठार शिवारात पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील गुरुदत्त मंगल कार्यालयासमोरील चंद्रकांत शिवाजी घुले यांच्या मालकीचे मे सुदर्शन ट्रेडर्सवर पथकाने छापा टाकत घराची व दुकानाची तपासणी केली.
यावेळी राज्यात प्रतिबंधित केलेला हिरा पान मसाला, आरएमडी पान मसाला, एम सेंटेड टोबॅको, रॉयल 717 सुगंधित तंबाखू, विमल पान मसाला असा विना परवाना मुद्देमाल विक्रीसाठी साठवून ठेवलेला आढळून आला. यात एकूण 13 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
अन्न व औषधच्या थकाने अवैध गुटखाचा साठा जप्त करून त्यांना घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशी केली असता गुटखा पुरवठादार प्रभाकर गुळवे यांचे नाव समोर आले. जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीने चंद्रकांत घुले व प्रभाकर गुळवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष खेडकर करत आहे.
दरम्यान, पठार भागात अवैध दारू , गांजा , गुटखा विक्रीचे पेव फुटले असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे गुटखा, दारू, गांजा किंग प्रबळ असल्याने नागरिकांत असुरक्षितता पसरली आहे. पुरवठादार यांचे आंतरराज्य अंमली पदार्थ तस्करी करणार्या टोळीशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. यातून अवैध गुटखा तस्करांची टोळीच्या मुळापर्यंत पोहचण्याचा आवाहन घारगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांच्यापुढे आहे. आता यावर ते कशी आणि काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण पठार भागाचे लक्ष केंद्रित झाले आहे.