File Photo 
अहमदनगर

सवलतीमुळे एसटी महामंडळाला आले अच्छे दिन

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महिलांसाठी पन्नास टक्के सवलत उपलब्ध केल्यामुळे एसटी महामंडळाच्या बस हाऊसफुल धावत आहेत. त्यामुळे महामंडळाला अच्छे दिन आले असून, अहमदनगर विभागाला दररोज सरासरी 55 ते 60 लाख रुपयांचे रोख उत्पन्न मिळू लागले आहे. प्रवाशांच्या सवलतीपोटीचे पैसेही शासनाकडून मिळत असल्यामुळे महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीत सुधारत असल्याचे चित्र आहे. दळणवळणासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा गोरगरिबांबरोबरच मध्यमवर्गीय जनतेला दिलासा देणारी आहे. अहमनगर विभागाकडे कोरोनापूर्वी साडेसातशेच्या आसपास बस उपलब्ध होत्या. कोरोना कालावधीत महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला. जवळपास शंभर बस मालवाहतुकीसाठी बाहेर काढण्यात आल्या. काही बस स्क्रॅप झाल्या. त्यामुळे आजमितीस 590 बसेस प्रवाशी घेऊन धावत आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारने अमृत योजना सुरू केली. या योजनेमुळे 75 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के सवलत दिली. त्यानंतर महिला प्रवाशांना सरसकट 50 टक्के सवलत दिली. या सवलतीमुळे महामंडळ आर्थिक खाईत लोटले जाईल, अशी टीका राज्यभरात सुरू होती. मात्र, कालांतराने महिलांची गर्दी वाढत गेली. या सवलतीमुळे एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होत असल्याचे पुढे आले आहे.

महामंडळाच्या बस प्रवाशांनी खचाखच भरून धावत आहेत. अहमदनगर विभागाच्या बसचा दररोज सरासरी 2 लाख किलोमीटरचा प्रवास होत आहे. त्यातून सरासरी 55 ते 60 लाख रुपयांचे रोख उत्पन्न महामंडळाच्या तिजोरीत जमा होत आहे. महिलांसाठीचे पन्नास टक्के व अमृत योजनेचे शंभर टक्के तिकिटाचे पैसे राज्य शासनाकडून उशिरा का होईना महामंडळाच्या तिजोरीत जमा होत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाला सध्या तरी अच्छे दिन आले आहेत.

सहलीसाठी धावताहेत दररोज 30 बस
शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सहली डिसेंबरपासून सुरू झाल्या आहेत. सुरक्षा, उत्तम सेवा आणि आणि प्रवासात 50 टक्के सवलत मिळत असल्यामुळे सहलीसाठी महामंडळाच्या बसची मागणी वाढली आहे. या सहली फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहेत. आजमितीस दररोज सरासरी 30ते 35 बस शालेय विद्यार्थ्यांना घेऊन पर्यटनस्थळी धावत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT