कर्जत : पुढारी वृत्तसेवा : खूनप्रकरणी न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यात गेल्या 8 वर्षांपासून गैरहजर राहणार्या आकाश्या पैंजण्या काळे (वय 56, रा. पिंपळवाडी, ता. कर्जत) याच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी आकाश्या काळे याच्यावर कर्जत पोलिस ठाण्यात सन 2013 मध्ये भादंंवि कलम 302, 201, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास होऊन आरोपी काळे याच्याविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात खटला भरण्यात आला होता. आरोपी काळे हा केवळ 6 महिने तारखांना हजर राहिला. मागील सात ते साडेसात वर्षे तो गैरहजर होता. आरोपी काळे याच्यावर वारंवार वॉरंट काढण्यात आले होते. वारंवार शोध घेऊनही तो मिळून येत नव्हता.
यातील फिर्यदीने तक्रार दिली की, आरोपी राजा उर्फ सचिन आकाश काळे (वय 22 रा. पिंपळवाडी, ता. कर्जत), धर्मा गंडीशा काळे (वय 34, रा. पिंपळवाडी, ता. कर्जत), कांताबाई उर्फ कांचन गजाबापू भिसे (वय 40, रा. भांबोरा, ता. कर्जत) आकाश पैंजण्या काळे (रा. पिंपळवाडी, ता. कर्जत) यांनी दि. 30 जुलै 2012 रोजी सकाळी 9 वाजता बारडगाव सुद्रिक शिवारात हत्यारांनी हनवटीवर, डोक्यावर मारहाण करून खून करून प्रेत कॅनॉलच्या पाण्यात टाकून देऊन पुरावा नष्ट केला.
त्यावरून आरोपींना अटक करण्यात आली होती. सुरुवातीस सहा महिने आरोपी काळे हा सुनावणी कामी न्यायालयात हजर राहिला. परंतु त्यानंतर सलग आठ वर्षे गैरहजर होता. त्याच्याविरुद्ध न्यायालयाने अजामिनपात्र वॉरंट काढले होते. कर्जत पोलिसांनी माहिती काढून दि. 25 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी काळे याला पिंपळवाडी शिवारातील जंगलातून अटक केली. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक फौजदार बाळासाहेब यादव, जवान दीपक कोल्हे यांनी ही कारवाई केली.