अहमदनगर

नगर-सोलापूर महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; पाच जखमी

अमृता चौगुले

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर-सोलापूर महामार्गावर शिराढोण गावाजवळील पेट्रोल पंपासमोर चार वाहनांचा विचित्र अपघात होऊन पाच जण जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात बुधवारी (दि.24) दुपारी चारच्या सुमारास घडला.
नगर-सोलापूर महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू असल्याने या महामार्गावर ठिकठिकाणी एकेरी वाहतूक केली जात आहे. महामार्गाचे काम करणार्‍या ठेकेदाराकडून कोठेही केव्हाही एकेरी वाहतूक केली जात आहे. तसेच, त्याबाबत कुठलेही दिशादर्शक फलक लावले जात नसल्याने या महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत.

बुधवारी (दि.24) दुपारी चारच्या सुमारास शिराढोण गावाजवळ असाच अचानक एकेरी मार्ग केलेला असताना आयशर टेम्पो व पिक-अपची समोरासमोर धडक झाली. त्याचवेळी पाठीमागून आलेली मोटारसायकल टेम्पोवर धडकली. तर, पिक अपच्या मागे असलेल्या एसटीची धडक बसल्याने पिक अप रस्त्यावरच पलटी झाला. या अपघातात मोटारसायकलस्वार, टेम्पो व पिक-अप मधील चालक व इतर, असे 5 जण जखमी झाले. सुदैवाने एसटी बसमधील प्रवाशांना कुठलीही इजा झाली नाही.

या अपघातानंतर तेथे नागरिकांची मोठी गर्दी झाली. वाहतुकीचीही कोंडी झाली होती. नागरिकांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात पोहोचविण्यासाठी 108 रुग्णवाहिका बोलावली. मात्र, रुग्णवाहिका लवकर पोहोचू शकली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक रणजित मारग, सहायक फौजदार भगवान गांगर्डे, हवालदार रमेश गांगर्डे व पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांबरोबर जखमींना रुग्णालयात पाठविण्यासाठी प्रयत्न केले. तसेच, महामार्गावरील वाहतुक सुरळीत केली. अपघातात जखमी झालेल्या 5 जणांवर िउपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT