घोडेगाव : पुढारी वृत्तसेवा : लम्पी आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या घोडेगाव येथील जनावरांचा बाजार साडे तीन महिन्यानंतर शुक्रवारी (दि.23) पूर्ववत सुरू झाला. यामध्ये पहिल्याच बाजारात 1650 जनावरे विक्रीसाठी आले. त्यातील 1308 जनावरांची खरेदी-विक्री होऊन दीड कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव देवदत्त पालवे यांनी दिली.
नगर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात लम्पी आजाराने बाधित जनावरांची संख्या वाढत होती. या पार्श्वभूमीवर मागील साडेतीन महिन्यापासून राज्यासह नगर जिल्ह्यातील सर्वच जनावरांचे बाजार बंद करण्यात आले होते.
घोडेगाव बाजार 9 सप्टेंबरपासून बंद होता. जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या विविध उपाययोजना व प्रतिबंधात्मक उपचार, लसीकरणामुळे लम्पी आजार आता आटोक्यात आला आहे. शेतकरी, व्यापार्यांनी आमदार शंकरराव गडाख यांच्याकडे बाजार सुरू करण्याची मागणी केली होती. लवकर बाजार सुरू होईल, असा शब्द आमदार गडाख यांनी दिला होता. ही मागणी लक्षात घेऊन त्यांनी बाजार सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याने शुक्रवारपासून (दि.23) बाजार सुरू करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली. यानुसार बाजार पूर्ववत सुरू झाला आहे. पहिल्याच दिवशी बाजारात मोठी आर्थिक उलाढाल झालेली पहायला मिळाली. पहिल्याच बाजारात एक कोटी 41 लाख 33 हजार 500 रुपयांची उलाढाल झाली.
नेवासा बाजार समितीचे प्रशासक गोकुळ नांगरे, सचिव देवदत्त पालवे व कर्मचार्यांनी बाजारात उपस्थित राहून शेतकरी व व्यापार्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घेतली. बाजार समितीचे प्रशासन, शेतकरी व व्यापार्यांनी बाजार सुरू केल्याबद्दल आमदार गडाख यांचे आभार मानले.
चीनसह अन्य देशात वाढत असणारा कोरोना, नवीन व्हेरिएन्ट व पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चेेमुळे सर्वच घटकांमध्ये काळजी व भीती जाणवत होती. शेतकरी, व्यापारी, दलाल आपापसात याच विषयावर चर्चा करत होते.
घोडेगाव बाजारात विक्रीसाठी आलेल्या 317 गायीपैकी 236 गायींची विक्री झाली, 150 बैलांपैकी 71 बैलांची विक्री झाली, तर 450 म्हैशींपैकी 375 म्हशींची विक्री झाली. 733 शेळ्यांपैकी 626 शेळ्यांची विक्री झाली. ऐकून 1650 जनावरांपैकी 1308 गाई, म्हशी, बैल व शेळ्यांची विक्री झाली. दुधाचे दर वाढल्याने म्हशींपेक्षा गाईंना मागणी अधिक होती.गाईंच्या बाजारात तेजी होती.