नगर; पुढारी वृत्तसेवा : शेकडो मुलांच्याआतील क्षमता समृद्ध करण्याचे काम शिक्षकांना करावे लागते. शिक्षकाचा चेहरा नेहमी आशावादी असावा. शिक्षक वर्गात प्रवेश करतो, तेव्हा चैतन्य व उत्साहाचा झरा वर्गात आला, असे विद्यार्थ्यांना वाटावे. याची सदैव जाणीव ठेवणारा शिक्षकच सदृढ समाज घडवू शकतो, असे प्रतीपादन पाणी फौंडेशनचे सदस्य, प्रख्यात व्याख्याते इंद्रजीत देशमुख यांनी केले.
गुरुकुल महिला आघाडीने जाहीर केलेल्या गुरुकुल नारीशक्ती पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. प्रसिद्ध साहित्यिक डॉ.संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास मनगाव प्रकल्पाचे संस्थापक डॉ.सुचेता धामणे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, डॉ.राजेंद्र धामणे, गुरुकुल महिला आघाडीच्या अध्यक्षा जयश्री झरेकर-इंगळे, सुनिता काटकर, जयश्री घोडेकर उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी पाटील म्हणाले, सगळ्या रिती भाती सांभाळते ती नारी. गुरुकुल मंडळाने दिलेले नारीशक्ती पुरस्कार शिक्षिकेंना प्रेरणादायी ठरतील. यावेळेस डॉ.संजय कळमकर, जयश्री झरेकर, स्वाती गोरे, राजश्री सोंडकर यांचेही भाषणे झाली.
स्वागत सुनीता काटकर, आभार सुदर्शन शिंदे, सूत्रसंचालन भाऊ नगरे व प्रियंका शेळके यांनी केले.