कर्जत : पुढारी वृत्तसेवा : कर्जत येथील क्रीडा संकुलासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मंजूर झाला आहे. या निधीतून या संकुलात अद्ययावत सुविधा खेळाडूंसाठी उपलब्ध केल्या जातील, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. कुळधरण येथील जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ व कर्जत तालुका क्रीडा संघटनेतर्फे आमदार पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र गुंड, राजेंद्र गुंड, ओंकार गुंड, तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष हेमंत खडके, उपाध्यक्ष प्रा शिवाजी धांडे, सतीश पंडित, दादा गदादे, राम पवार, दादा शिंगाडे, अजित वडवकर, कैलास सुपेकर, भरत तांबे यांच्यासह शिक्षक संघटनेच पदाधिकारी, मुख्याध्यापक उपस्थित होते.
आमदार पवार म्हणाले, गुंड परिवार व तालुका क्रीडा संघटननेने माझा सन्मान केला. मी छोटा कार्यकर्ता आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मोठे संघटन आहे. यासाठी राज्यातील अनेक नामवंत खेळाडू व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी मोठे योगदान दिले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी क्रिकेट, कुस्ती व कबड्डीसाठी मोठे योगदान दिले. क्रीडा क्षेत्रात अनेक नवनवीन उपक्रम पवार यांनी राबविले. आयपीएलसारखी स्पर्धा ही खर्या अर्थाने नवीन तरुण खेळाडू, माजी खेळाडूंसाठी एक संधी निर्माण करण्याचे काम पवारांनी केले. त्यांनी कधीही खेळात राजकारण आणलेे नाही.
आमदार पवार म्हणाले, कर्जतच्या क्रीडा संकुलासाठी दीड कोटी रुपये मंजूर झाले होते. मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर यात अडीच कोटी असे साडेचार कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. यामधून ग्रामीण खेळाडूंसाठी सुविधा उपलब्ध केल्या जातील. तसेच क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेेणार असून, कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी अध्यक्षपदाचा वापर केला जाईल.
महेंद्र गुंड म्हणाले, आमदार पवार यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद मिळावे, अशी जनतेची इच्छा आहे. त्यांच्या अध्यक्षपदामुळे क्रिकेटसह सर्वच खेळांना फायदा होईल.
राजेंद्र गुंड म्हणाले, आमदार पवार यांच्यामुळेच कर्जत-जामखेड मतदारसंघाचे नाव देशात पोहोचले आहे. मी स्वतः एक खेळाडू असल्यामुळे मला खेळ व खेळाडूंबद्दल माहिती आहे. आमदार पवार यांनी राष्ट्रीय पातळीवरील महिलांची कुस्ती स्पर्धा घेऊन एक नवी ओळख निर्माण केली. त्यावेळी प्राचार्य सूर्यभान सुद्रिक, भरत तांबे व दादा गदादे यांची भाषणे झाली. आभार कैलास सुपेकर यांनी मानले.