अहमदनगर

नेवासा : दिव्यांग अभियंत्यास मागितली 10 लाखांची खंडणी

अमृता चौगुले

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील सौंदाळा वीज उपकेंद्रात कार्यरत असलेल्या विद्युत अभियंत्यास अज्ञात व्यक्तींकडून 10 लाखांची खंडणी मागण्यात आली आहे. ही खंडणी दिल्यास परिवारासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.  महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 220 के.व्ही सौंदाळा (भेंडा) उपकेंद्र येथे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वर्ग 1 या पदावर शंतनू बाबूराव सूर्यकर हे कार्यरत आहेत. शुक्रवारी (दि. 25) दुपारी दीडच्या दरम्यान अचानक त्यांना अज्ञात व्यक्तीने फोन केला. तुझी कुठे कुठे प्रॉपर्टी आहे ? तू कुणाला पैसे दिले आहेत, ते मला माहिती आहे. तू कुणाकडेही जा, माझे न ऐकल्यास, मला दहा लाख रुपये न दिल्यास तुला परिवारासह संपवून टाकू, अशी धमकी दिली. त्यामुळे वीज कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे. या प्रकाराची नेवासा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय करे यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, गुन्हा दाखल करीत तातडीने तपास चक्रे फिरविली आहेत.

शंतनू सूर्यकर हे दिव्यांग अभियंता असून, त्यांनी अनेक सामाजिक कामात मदत केली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लिखाणाचे अनेक वाचक आहेत. तसेच, ते प्रहार दिव्यांग संघटना मुंबई 11 व सबऑर्डिनेट इंजिनिअर्सचे सक्रिय पदाधिकारी असल्याने, त्यांचा सामाजिक संपर्कही दांडगा आहे. त्यामुळे त्यांना आलेल्या धमकीच्या दूरध्वनीने विद्युत क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या खंडणीमागे नेमके दडलयं कोण? याचा तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज मोंढे, पोलिस नाईक भागवत शिंदे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT