अहमदनगर

नगर : सव्वा लाख विद्यार्थी देणार अग्निपरीक्षा

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : फेब्रुवारी/ मार्च 2023 मध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेची प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. नगर जिल्ह्यात यावर्षी इयत्ता 10 वीचे 69 हजार 534 आणि 12 वीचे 63 हजार 313 विद्यार्थी परीक्षा देणार आहे. यासाठी केंद्र, परिरक्षक यांचीही नियुक्त करण्यात आलेली आहे. दरम्यान, यावर्षी बोर्डाच्या परीक्षेसाठी नियमावलीमध्ये झालेला बदल, यातून सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चा, यामुळे ही विद्यार्थी आणि पालकांमध्ये काहीसा गोेंधळ निर्माण झाल्याचेही पहायला मिळत आहे. त्यामुळे याविषयीपरीक्षेपूर्वीच स्पष्ट धोरण होणे अपेक्षित असल्याचे बोलले जाते.  यंदाच्या 10 वी आणि 12 वी परीक्षेची परीक्षा मंडळाकडून तयारी सुरू आहे. नगर जिल्ह्यातही माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या मार्गदर्शनात परीक्षा केंद्र, परिरक्षक यासह अन्य यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे.

इयत्ता 12 वीची  परीक्षा 21 पासून

उच्च माध्यमिक शालांत अर्थात 12 वीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे.जिल्ह्यातील 108 केंद्रांवर ही परीक्षा पार पडेल. 63313 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी आपली नोंदणी केलेली आहे. या परीक्षार्थींची बैठक व्यवस्था करण्यासाठी केंद्र निहाय शिक्षणाधिकारी कडूस हे आढावा घेत आहेत.

इयत्ता 10 वीची 2 मार्चपासून परीक्षा 

दहावीची परीक्षा ही 2 ते 25 मार्च 2023 या कालावधीत घेतली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातून 69534 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 179 केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असून, त्यासाठी 21 परिरक्षक असणार आहेत.

1 लाख 32 हजार विद्यार्थ्यांची अग्नीपरीक्षा
इयत्ता 10 वी आणि 12 वी इयत्तेतील तब्बल 1,32,847 विद्यार्थी या परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी परीक्षा मंडळाकडून बदलत्या नियमावलीवरही चर्चा सुरू आहे. कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासंदर्भात शिक्षणाधिकारी कडूस यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी ढवळे यांची चोख व्यवस्था केलली आहे.

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाकडून केंद्र निश्चिती झालेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर परीक्षार्थींची बैठक व्यवस्था केली जाणार आहे. यासह कॉपीमुक्त परीक्षेसाठीही परीक्षा मंडळाच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.
                                       -अशोक कडूस, शिक्षणाधिकारी, माध्यमिक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT