अहमदनगर

नगर : अन् मुलांच्या चेहर्‍यावर हसू…! पूरक आहार वाटपाचे छायाचित्र दाखवा; शिक्षणाधिकार्‍यांची पारदर्शकता

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेतील काही शाळांमध्ये पूरक आहार दिला जात नसल्याकडे दै. पुढारीने लक्ष वेधले होते. शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी तातडीने याबाबत अहवाल मागवतानाच, यापुढे दर आठवड्याला पूरक आहार दिल्याचे छायाचित्र पाठविण्याच्या शाळांना सूचना केल्या. काल अनेक शाळांनी मुलांना राजगिरा लाडू, केळी, बर्फी, त्यानुसार आता पूरक आहार मुलांना देतानाचे छायाचित्र शिक्षण विभागाच्या सोशल ग्रुपवर टाकले जात आहे. त्यामुळे कोणकोणत्या शाळेत पूरक आहार वाटला, याची माहिती मिळणे सोपे झाले आहे.  जिल्ह्यातील काही मराठी शाळांमध्ये पोषण आहार दिला जातो. मात्र पूरक आहार वाटलाच जात नसल्याची माहिती पुढे आली होती.

भाजीपाला, इंधन खर्चातच पूरक आहारातील केळी, राजगिरा लाडू, शेंगदाणे लाडू, सफरचंद, खारीक खोबरे यासाठीही निधी दिला जातो. मात्र तरीही मुलांना पूरक आहारापासून वंचित ठेवले जात असल्याची गंभीर बाब चर्चेत आली होती. शिक्षणाधिकारी पाटील यांनी सीईओ आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात तपासणी मोहिम हाती घेतली. शालेय पोषण आहारचे अधिक्षक कुलकर्णी यांनी याबाबत सूचना केल्या. त्यानंतर तो अहवाल प्राप्त झाला. मात्र हा अहवाल संदिग्ध असल्याने आता शिक्षणाधिकारी स्वतःच शाळा भेटी सुरू करणार आहेत. तसेच यापुढे सर्वच शाळांनी आठवड्यातून ठरलेल्या दिवशी मुलांना पूरक आहार वाटप करतानाचे छायाचित्र शिक्षण विभागाच्या सोशल माध्यम ग्रुपवर पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेतही पारदर्शकता येणार आहे.

अहवाल गोलमाल?

पूरक आहार वाटप चौकशी करताना पालक व विद्यार्थ्यांचे जबाब घेऊन अहवाल पाठविण्याच्या शिक्षणाधिकार्‍यांनी सूचना केल्या होत्या. मात्र अनेक ठिकाणी पालकांना यापासून अंधारात ठेवले गेल्याचीही चर्चा आहे. हा अहवाल गोलमाल असून, याप्रकरणी सीईओंनी स्वतः शाळांना भेटी दिल्यास बरेच काही समोर येणार असल्याचेही दबक्या आवाजात बोलले जात आहे.

गय करणार नाही…!

पोषण आहाराचे सर्व अहवाल प्राप्त झाले आहेत. मात्र यापुढे मुलांना पूरक आहार दिल्यानंतर त्याचे फोटो पाठविण्याच्या शाळांना सूचना केल्या आहेत. तसेच मी स्वतः काही शाळांना सरप्राईज व्हिजिट करणार आहे. दोषी आढळल्यास कोणाचीही गय करणार नाही, असेही शिक्षणाधिकारी पाटील यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.

दै. पुढारीने केलेल्या पाठपुराव्याला आले यश

शाळेत पूरक आहार दिला जातो, हीच बाब पालकांसह, शाळा व्यवस्थापनलाही माहिती नव्हती. मात्र दै. पुढारीने यावर प्रकाश टाकल्यानंतर शिक्षणाधिकारी पाटील यांनीही तितक्याच जबाबदारीने याप्रकरणी चौकशी लावली. यापुढे मुलांना पूरक आहार वाटप करतानाचे छायाचित्रच दाखवा, असे सुनावल्याने ही योजना आताशी गतीमान होताना दिसत आहे. काल शाळेत केळी, लाडू, बर्फी, शिरा, मिळाल्याचे मुलांनी आनंदाने घरी सांगितले. त्यामुळे पालकांनी दै. पुढारी अन शिक्षणाधिकार्‍यांना धन्यवाद दिले.

SCROLL FOR NEXT