भातकुडगाव : पुढारी वृत्तसेवा : सततच्या पावसाने दहिफळ जुने येथील शेतकरी दिलीप परदेशी यांच्या केळी बागेत पाणी साचले असून, वादळाने निम्मी बाग खाली कोसळून केळीचे नुकसान झाले आहे. व्यापारी वर्गाकडून हा माल खरेदी केला जात नसल्याने शेतकर्याचे आर्थिक नुकसान होत आहे. तर, इतर उभ्या केळी बागेतील मालही कवडीमोल भावाने मागून व्यापारी वर्गाकडून थट्टा केली जात असल्याची व्यथा परदेशी यांनी मांडली आहे. गेल्या तीन चार वर्षापासून बर्यापैकी पाऊस होत असल्याने व जायकवाडी धरण कडेला असल्याने शाश्वत पाण्याआधारे शेतकरी ऊस, केळी अशी जास्त पाणी लागणारी पिके घेतात. ऊस तोडीला आल्यावर गेल्या तीन चार वर्षांपासून तोडणीसाठी कामगार पैसे घेतात. मात्र, वेळेत ऊस तोडला जात नाही. अशा परिस्थितीला वैतागून अनेक शेतकरी इतर शेतमाल घेण्याकडे वळले आहेत. दहिफळ जुने येथील शेतकरी दिलीप परदेशी यांनी आपल्या दोन एकर शेतीत ऊसाऐवजी केळी लागवड केली होती. बाग तोडणीला आली असता सुरुवातीला 20 ते 22 रूपये किलोचा भाव आवक वाढल्याने 8 ते 10 रूपयांवर आला. अशा परिस्थितीत परदेशी यांनी केळीचा पहिला तोडा 8 रुपये प्रमाणे दिला.
पुढच्या तोड्यास जास्तीचा माल निघणार होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे त्यांच्या केळी शेतात पाणी साचून राहिले व एक दिवस झालेल्या जोरदार वादळी पावसात त्यांची निम्मी केळी बाग आडवी झाली. तर, काही बाग तग धरून आहे. मात्र, माल काढण्यास रस्ता व शेतात चालण्यास येणार्या अडचणीमुळे केळी बागेचे नुकसान होते आहे. अशा नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या परदेशी यांची व्यापारी वर्गाकडूनही थट्टा सुरू आहे. अवघ्या 3 ते 4 रुपये भावाने माल खरेदी करू. मात्र, वाहतूक खर्च तुम्हाला करावा लागेल, असे सांगत अडवणूक केली जात आहे. सरकारकडून नुकसानीचे पंचनामेही केले जात नाहीत.
शासनाने नुकसान भरपाई द्यावी
गावात इतर शेतकर्यांच्या बागेतील केळी 8 ते 14 रुपये भावाप्रमाणे खरेदी केली जात आहे. मात्र, आपली अडवणूक केली जात आहे. केळीबागेस एकरी 60 हजारापर्यंत खर्च झाला असून, नैसर्गिक आपत्तीत हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. आत्महत्या करण्याचा विचार मनात घोळत असून, सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी दिलीप परदेशी यांनी केली आहे.