अहमदनगर

नगर : पाटबंधारे, बांधकामची निवडणूक गाजणार !

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : सुमारे 250 कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचार्‍यांच्या सोसायटीत गत पाच वर्षांत सत्ताधार्‍यांमधीलच एका गटाने तत्कालिन अध्यक्षांविरोधात बंड करून सत्ता हस्तगत केली होती. आता पाच वर्षानंतर याच सहकारी पतसंस्थेची निवडणूक लागली असून, सत्त्ताधार्‍यांनी पुन्हा त्या अध्यक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी व्यूहरचना आखली आहे, तर 'राजकीय बदला' घेण्यासाठी तत्कालिन अध्यक्षांनीही सत्ताधार्‍यांविरोधात समविचारी लोकांची मोट बांधल्याने ही निवडणूक चुरशीची आणि तितकीच प्रतिष्ठेची बनली आहे.

पाटबंधारे सोसायटीची 1946 ची स्थापना आहे. संस्थेच्या 84 कोटी 54 लाखांच्या सभासद ठेवी आहेत. 79 कोटी 33 लाखांचे कर्ज वाटप आहे. 30 कोटींची गुंतवणूक आहे. गत निवडणुकीत संस्थेचे 2302 सभासद होते. त्यावेळी दत्तात्रेय गडाख आणि बी. काळे यांच्या गटात निवडणूक झाली. त्यात गडाख यांचा पॅनल विजयी झाला. मात्र, त्यानंतर गडाख गटात धुसफूस सुरू झाली. तत्कालिन मंडळाचे अध्यक्षांनी अध्यक्ष, सचिवांना हाताशी धरून चुकीचा कारभार केला. नोकरभरतीही बेकायदेशीर केली, असे आरोप नारायणराव तमनर यांनी केले आहेत. याच कारणातून 16 संचालक बाहेर पडले. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या.

पुढे मंडळाच्या अध्यक्षांंना दूर ठेवून 16 जणांनी तीन-चार वर्षे कारभार हाकल्याचे सांगितले जाते. आता पाच वर्षांनी संस्थेच्या निवडणुकीची लगबग सुरू झालेली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अल्ताफ शेख यांची नियुक्ती आहे. तर, 16 जणांनी स्थापन केलेल्या सत्ताधारी 'सहकार' मंडळाचे उमेश डावखर आणि नारायणराव तमनर हे नेतृत्व करत आहे. याविरोधात पूर्वीचे 'अध्यक्ष' दत्तात्रय गडाख यांनी किशोर गांगुर्डे यांच्यासमवेत पॅनल उभा केला आहे. त्यांना गत निवडणुकीत विरोधक असलेले बी.काळे यांचीही साथ मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

35 टक्के सभासद अपात्र !
मार्च 2020 नुसार मतदार यादी तयार करण्यात आलेली आहे. 2302 पैकी सेवानिवृत्त, मयत, थकबाकी अशा वेगवेगळ्या कारणांतून 814 सभासदांना वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे अंतिम यादीत 1488 सभासद मतदानास पात्र ठरले आहेत. एकूण संख्येच्या 35 टक्के सभासद अपात्र ठरू शकतात, हे या निवडणुकीतून प्रथमच पहायला मिळाले आहे.

18 मार्च रोजी मतदान !
गत आठवड्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज 16 तारीख अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. काल बुधवार अखेर 21 जागांसाठी 98 इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. 18 मार्च रोजी मतदान व त्यानंतर 19 ला मतमोजणी होणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणेने तयारी पूर्ण केलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT