अहमदनगर

डिंभे-माणिकडोह बोगद्यावर ठाम भूमिका हवी, श्रीगोंदा दौर्‍यात विरोधी पक्षनेते पवारांनी दिली बगल

अमृता चौगुले

अमोल गव्हाणे : 

श्रीगोंदा : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या श्रीगोंदा दौर्‍यानंतर तालुक्याचे राजकारण पुरते ढवळून निघाले आहे. मात्र, ज्या डिंभे- माणिकडोह बोगद्यावर ते काहीतरी आश्वासक बोलतील, अशी आशा असताना पवारांनी मात्र या विषयाला बगल देत त्यावर भाष्य करण्याचे टाळले. श्रीगोंदा तालुक्याच्या जिव्हाळ्याच्या असणार्‍या डिंभे-माणिकडोह बोगदा प्रश्नावर कुणी ठाम भूमिका घेणार आहे का? असा सवाल शेतकर्‍यांच्या मनात उपस्थित होऊ लागला आहे. राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते पवार श्रीगोंदा येथे आले होते. पवार यांच्या दौर्‍यामुळे डिंभे ते माणिकडोह बोगद्याचा विषय चर्चेत आला. डिंभे ते माणिकडोह बोगदा हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित आहे. हा बोगदा झाला, तर तीन ते चार टीएमसी पाणी अधिकचे उपलब्ध होणार आहे.उन्हाळ्यात एक आवर्तन सहज मिळू शकते. परिणामी पारनेर, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यांतील उन्हाळी पिके वाचू शकतात विशेषतः उसाच्या पिकाला या पाण्याचा मोठा फायदा होणार आहे. या सगळ्या सकारात्मक बाबी सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या. मात्र, त्यावर आतापर्यत कुठलाच निर्णय झाला नाही.

भाजप सरकारने या बोगद्याला मंजुरी दिली अन राज्यात सत्ताबदल झाला. त्यानंतर देशाचे नेते शरद पवार यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याचे सूचित केले किंबहुना सभापती बाळासाहेब नाहटा यांच्यासह अनेक नेत्यांनी पवार यांनी या प्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी केली ज्येष्ठ नेते पवार यांनी श्रीगोंदा येथे जाहीर सभेत हा प्रश्न निकाली काढण्याचा शब्द दिला होता. त्यावर पवार यांनी या प्रश्नाची जबाबदारी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवली. ना. अजित पवार यांनी यावर बैठक घेत सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला. पण त्यापुढे मात्र हा प्रश्न 'जैसे थे'च राहिला. अर्थात या बोगद्याच्या निर्मितीवर पुणे जिल्ह्यातील काही मातब्बर मंडळीचा आक्षेप आहे. त्यामुळे या बोगद्याचा प्रश्न जाणीवपूर्वक 'जैसे थे' ठेवला गेला.

राज्यात मध्यतंरीच्या काळात राजकीय स्थित्यंतरे घडली अन राज्यात सत्ताबदल झाला. मात्र, तरीही हा प्रश्न ना.पवार सोडवू शकतात. हा विश्वास श्रीगोंदेकरांना असल्याने ना.पवार आपल्या भाषणात डिंभे-माणिकडोह बोगद्यावर काहीतरी भाष्य करतील किंबहूना ना. पवार यांचे या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी माध्यमांनीही यावर वार्तांकन केले होते. मात्र, ना. पवार यांनी या विषयाला लिलया बगल देत कुठलेही भाष्य करण्याचे टाळले.यामागे काय कारणं असू शकतात, हा संशोधनाचा भाग ठरेल.

पारनेर, कर्जत मध्ये राष्ट्रवादीचा आमदार असताना श्रीगोंदा तालुक्यातही राष्ट्रवादीला वातावरण अनुकूल असताना ना. पवार या तीन तालुक्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या प्रश्न का बोलले नसतील? हा प्रश्न आता चर्चिला जाऊ लागला आहे. दुसरीकडे मात्र ना. पवार यांच्या रोखठोक भाषणामुळे श्रीगोंदा नगरपालिकेतील अंतर्गत गटबाजी उफाळून आली किंबहुना ना. पवार यांचे भाषण या सर्व घडामोडीला निमित्त ठरले. मनोहर पोटे यांना गटनेते पदावरून हटवत गणेश भोस यांची निवड झाली. खड्याकडे लक्ष वेधल्याने मुरुमाने का होईना खड्डे बुजविण्यात आले. डिंभे ते माणिकडोह बोगदा होणे ही काळाची गरज आहे. हा बोगदा झाला तरच भविष्यात कुकडीचे पाणी मिळू शकणार आहे, अन्यथा कुकडीचे पाणी मृगजळ ठरू शकते.

विरोध मोडून काढायला हवा !
डिंभे ते माणिकडोह बोगदा होऊ नये, यासाठी झारीतील शुक्राचार्य प्रयत्नशील असले, तरी आता शिंदे गट आणि भाजप सत्तेत आहे. हा विरोध मोडीत काढून बोगद्याच्या प्रक्रियेला गती द्यायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT