अहमदनगर

संगमनेरात थोरात-विखेंमध्ये दुरंगी लढत!

अमृता चौगुले

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी आज (गुरुवारी) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी दाखल 99 अर्जांपैकी थोरात व विखे या दोन्ही गटांच्या तब्बल 54 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. यामुळे 18 जागांसाठी 45 उमेदवार निवडणूक रणांगणामध्ये उतरले.

दरम्यान, यावेळी प्रथमच काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात गटाविरोधात भाजपचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचा गट निवडणूक रणांगणात अधिकृत पॅनल करून उतरला आहे. यामुळे आता आजी-माजी मंत्र्यांच्या गटांमध्ये खर्‍या अर्थाने दुरंगी लढत होणार, असे स्पष्ट झाले आहे.

संगमनेर बाजार समिती संचालक मंडळासाठी 28 एप्रिल रोेजी मतदान होत आहे. निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी कृषी पदवी धर मतदारसंघातील सर्वसाधारण महिला राखीव इतर मागास प्रवर्ग विमुक्त भटक्या जाती- जमाती या प्रवर्गातील छाननीनंतर 58 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते. यापैकी 32 जणांनी उमेदवारी अर्ज माघार घेतले.

यामुळे आता 26 उमेदवारी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण अनुसू चित जाती- जमाती दुर्बल घटक या प्रवर्गातून 22 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यापैकी 12 जणांनी माघार घेतल्यामुळे 10 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. व्यापारी आडते मतदार संघातून 15 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 9 जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले.

त्यामुळे आता 6 उमेदवार रिंगणात आहेत. हमाली माथाडी मतदार संघातून 4 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यापैकी 1 जणांने माघार घेतल्यामुळे 3 उमेदवार उरले. अशा एकूण 18 जागांसाठी 45 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत यावेळी प्रथमच माजी मंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात व भाजपचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या दोन्ही गटांमध्ये प्रथमच स्वतंत्र पॅनल तयार झाला.

यामुळे ही निवडणूक खर्‍या अर्थाने अतीतटीची होईल, असे चित्र निर्माण झाले आहे. आ. थोरात व मंत्री विखे यांच्या दोन्ही गटातील उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अनेकांना माघार घेण्यासाठी दोन्ही गटातील पॅनल प्रमुखांना अनेक उमेदवारांची मनधरणी करावी लागली तर उमेदवारी न मिळाल्याने काहीजण नाराज झाले. नाराज उमेदवार आता नेमकी काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

माजी उपसभापतीची निवडणुकीतून माघार
संगमनेर बाजार समितीचे माजी उपसभापती, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश कानवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, परंतु माघारीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अचानक अर्ज माघार घेतला. याबाबत विचारले असता ते म्हणाले, पक्षाचा आदेश महत्त्वाचा आहे. पक्षाने आदेश दिल्याने निवडणुकीतून माघार घेतली, परंतु मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पॅनेल निवडणुकीत उतरविल्याचे भाजप तालुकाध्यक्ष सतीश कानवडे यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.

शिवसेनेला अधिकृत 1 तर स्वीकृतला 1
संगमनेर बाजार समिती सत्ताधारी काँग्रेससह शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांची महाविकास आघाडी तुटत होती, परंतु शेवटच्या क्षणी काँग्रेसने ठाकरे शिवसेनेचे उमेदवार विजय सातपुते यांना महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून अधिकृत उमेदवारी तर 1 स्वीकृत उमेदवार घेणार असल्याचे काँग्रेस विधि मंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी सांगितल्याची माहिती उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे शहरप्रमुख अमर कतारी व तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली.

SCROLL FOR NEXT