बोटा : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर येथे ग्रामसभेचे कामकाज सुरू असताना सामाजिक कार्यकर्ते सुनील नामदेव इघे याने शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्यावर घारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसरीकडे इघेसह अन्य दोघांना रस्त्यात अडवून केलेल्या मारहाण प्रकरणी प्रभाकर कदम यांच्या फिर्यादीनुसार वाढीव कलमान्वय्ये गुन्हा दाखल झाल्याच्या चर्चेमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, हा तपास पो. नि. आता शिर्डीचे डिवायएसपी संजय सातव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी सांगितले की, संगमनेर तालुक्याच्या पठार भागात साकूर येथे ग्रामसभा सुरू होती. ग्रामसभेत विषयानुसार चर्चा सुरू असताना गावातील सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे ग्रामसभेतील विषयसोडून इतर बाबींवर मोठ्याने बोलू लागला. हा प्रकार सरू असताना ग्रामसेवक नागेश पाबळेंसह अन्य लोकांनी इघे यास समजून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र इघे याने मोठ-मोठ्याने बोलत शिवीगाळ करून अरेरावी केली. ग्रामसेवक पाबळे म्हणाले, 'विषयानुरूप सूचना व प्रश्न असल्यास सभेत मांडा', असे सांगत समजावण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, सभेचे इतीवृत्त नोंदवत असताना इघे यांनी रजिस्टर व फाईल ओढत फाडून टाकत जिवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी ग्रामसेवक नागेश श्रीराम पाबळे यांनी घारगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून सुनील नामदेव इघे याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, इघे यांनीही मारहाणीनंतर फिर्याद दिली आहे. पुढील तपास पो . नि. सुनील पाटील करीत आहेत.
संगमनेर तालुक्यातील साकूरचे माजी सरपंच शंकर खेमनर व सोसायटीचे चेअरमन इंद्रजित खेमनर यांच्यावर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले. या घटनेच्या निषेधार्थ साकूर पठार भागात व्यापार्यांनी एक दिवस सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळत, खोटे गुन्हे दाखल केल्याच्या घटनेचा निषेध केला.
संगमनेर तालुक्यातील साकुर गावातील स्वयम घोषित सामाजिक कार्यकर्ते सुनील ईघे यांनी शंकर हनुमंत खेमनर, इंद्रजित अशोकराव खेमनर आदींवर खोटे गुन्हे दाखल करून गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दाखल गुन्हे रद्द करावे, या मागणीसाठी साकुर येथील व्यापारी व पठार भाग ग्रामस्थांनी घारगाव पोलिस स्टेशनसमोर आज (सोमवार दि. 2) जानेवारी रोजी आमरण साखळी उपोषण सुरू करीत पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्ग अडवून रास्ता रोको करणार असल्याचे निवेदन ग्रामस्थ व व्यापार्यांनी घारगाव पोलिस स्टेशनचे पो.नि.सुनील पाटील यांना 31 डिसेंबर रोजी निवेदन दिले. यावर पोलिस प्रशासनाकडून नोटीस बजावत हे आंदोलन सद्य स्थितीत स्थगित करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, साकुरकरांनी खोटे गुन्हे दाखल झाल्याने या घटनेचा निषेध करीत एक दिवस स्वयंफूर्तीने कडकडीत बंद पाळला.