अहमदनगर

नगर-मनमाड महामार्ग पायवाट घोषित करा संतप्त प्रवासी, जनतेची अनोखी मागणी

अमृता चौगुले

कोल्हार : पुढारी वृत्तसेवा : 'जिंदगी मौत ना बन जाए, संभालो यारो,' असे म्हणण्याची वेळ वाहनचालकांवर यावी, अशीच काहीशी दुरवस्था नगर-मनमाड महामार्गावरून जाणार्‍या वाहनचालकांची झाली आहे. या महामार्गावर जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडल्याने या महामार्गाची अक्षरशः चाळण झाल्याने हा मार्ग वाहनचालकांसाठी अक्षरशः 'मौत का कुवाँ,' झाला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत 8 -9 निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

या महामार्गाच्या दुरुस्तीबाबत 'पुढारी'ने अनेक वेळा वृत्त प्रसिद्ध करून, या प्रश्नी जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहोचविल्या आहेत. अनेकांनी गांधीगिरी करून या खड्ड्यांत वृक्षारोपण केले. काही संघटनांनी आंदोलने केली. परंतु टक्केवारीच्या पाशात अडकलेल्या संबंधित अधिकार्‍यांना जरासुद्धा दखल घ्यावीशी वाटली नाही. या टक्केवारीच्या झंझटीमुळे पहिल्या ठेकेदाराने राज्यमार्ग दुरुस्तीचे काम अर्धवट सोडले. त्यामुळे दुरुस्तीसाठी जागोजागी खोदून ठेवलेला हा महामार्ग आणखी धोकादायक झाला आहे. 'जपून-जपून जारे पुढे धोका आहे,' असा इशारा वाहनचालक एकमेकांना देत जणू पायवाट बनलेल्या या महामार्गावरून मार्गक्रमण करीत आहेत.

प्रसारमाध्यमांवरून या महामार्गाबाबत अनेकजण तिखट प्रतिक्रिया देतात. अनेकांकडून या महामार्गावर विनोद देखील होत आहेत. सर्वाधिक चर्चा होत असलेला हा पहिलाच महामार्ग आहे. शिर्डी-कोपरगावपासून नव्यानेच हाती घेतलेले समृद्धी महामार्गाचे काम शासनाने वेगाने हाती घेऊन पूर्णत्वाला नेले. परंतु आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शिर्डी ते शनिशिंगणापूरकडे जाणार्‍या या महामार्गावर कोट्यवधी रुपयांचा निधी मिळून देखील या महामार्गाची अवस्था दयनीय आहे. आणखी किती दिवस साई व शनि महाराज भक्तांना या राज्यमार्गावरील खड्ड्यांच्या यातना सहन कराव्या लागणार आहेत. आणखी किती निष्पाप बळी या महामार्गावर गेल्यावर शासन व प्रशासनाला महामार्ग दुरुस्तीबाबत जाग येणार आहे.

या महामार्गाच्या दुर्दशेकडे उघड्या डोळ्यांनी बघा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. महामार्ग दुरुस्तीला अजूनही वेळ लागणार असेल, तर किमान पॅचिंगचे काम हाती घेऊन तात्पुरती डागडुजी करून खड्डे बुजवून वाहनचालकांसह श्रीसाई व शनिभक्तांचे आशीर्वाद घ्यावेत, भविष्यातही अशीच दयनीय अवस्था राहिली, तर मोठ्या जन आंदोलनाला शासनाला सामोरे जावे लागेल. प्रशासनाने तत्काळ या रस्त्याचे काम मार्गी लावावे.

कमिशन घेणे हाच आमचा धंदा
महामार्ग दुरुस्ती कामासाठी मुरूम व मातीचा वापर केल्यामुळे नुकत्याच झालेल्या पावसाने जागोजागी महामार्गावर अक्षरशः गवत उगवले आहे. यामुळे हा महामार्ग आता 'हरित मार्ग'सुद्धा दिसू लागला आहे. 'कुणी निंदा, कुणी वंदा, टक्केवारी घेणे हाच आमचा धंदा', या प्रकारामुळेच या महामार्गाचे काम रखडले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT