अहमदनगर

नगर : सात नगरसेवकांसह दोन स्वीकृत प्रभाग रचनेनंतर महापालिकेत 75 सदस्य

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  नामनिर्देशीत सदस्य वाढीच्या दृष्टीने महापालिका अधिनियमात सुधारणा करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने तत्वत: मान्यता दिल्यानंतर नगर महापालिकेतील स्वीकृतांचा आकडा दोनने वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान वार्ड फेररचनेनंतर नगरसेवकांची संख्या 68 वरून 75 होईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नव्या सुधारणेनंतर अहमदनगर महापालिकेतील पाच स्वीकृत नगरसेवकांची संख्या दोनने वाढून सात होणार आहे. महापालिकेच्या कामकाजात गुणात्मक बदल करण्याच्या दृष्टीने राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला. नामनिर्देशित सदस्य वाढविण्याच्या दृष्टीने महापालिका अधिनियमात सुधारणा करण्याचा

तत्त्वतः निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. तसेच याबाबत राज्याचे महाधिवक्ता यांचे अभिप्राय घेऊन त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. सध्या महानगरपालिकांतील नामनिर्देशित सदस्यांची संख्या जास्तीजास्त पाच इतकी आहे. राज्यात शहरी प्रशासनास सहकार्य करण्यासाठी व अनुभवी, कार्यकुशल व नागरी प्रशासनाचे ज्ञान असलेल्या, शासनाने केलेल्या नियमांनुसार विहित अर्हता धारण करणार्‍या व्यक्तींची निवड नामनिर्देशित सदस्य म्हणून केली जाते.

साधारणपणे ज्या महापालिकेत 100 नगरसेवक असतील तिथे 10 स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. मात्र, ज्या महापालिकेत 100 पेक्षा कमी नगरसेवक असतील तिथे नगरसेवक संख्येच्या दहा टक्के स्वीकृत नगरसेवक असतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नगरसेवक लागले कामाला
महापालिका निवडणूक अगदी काही महिन्यावर आल्याने विद्यमान नगरसेवक कामाला लागले आहेत.
वाढदिवस, घरघुती कार्यक्रमांना हजेरी लावण्यावर नगरसेवकांनी भर दिणे सुरू केले आहे. आपल्या प्रभागातील कोणीही नाराज होणार नाही याची नगरसेवक काळजी घेऊ लागले आहेत. वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे.

SCROLL FOR NEXT