अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : मार्च व एप्रिल महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील 33 हजार 956 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचा आर्थिक फटका 59 हजार 376 शेतकर्यांना बसला. नुकसानभरपाई अदा करण्यासाठी 57 कोटी 34 लाख 64 हजार रुपयांचा निधी आवश्यक आहे. शासनाने मार्च महिन्यातील नुकसानपोटी 10 कोटी 41 लाखांचा निधी मंजूर केला असून, शासनस्तरावर अनुदान वाटप प्रक्रिया सुरु आहे. मात्र, एप्रिल महिन्यात झालेल्या नुकसानीपोटीची रक्कम अद्याप मंजूर नाही. त्यामुळे बाधित शेतकर्यांना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे रब्बी हंगामातील सर्वच पिके जोमात होते. फळबागा देखील चांगल्याच बहरल्या. रब्बी पिके काढणीला आली असतानाच, मार्च महिन्याच्या पहिल्या व तिसर्या आठवड्यांत जोरदार हजेरी लावली. त्यामुळे 6 हजार 877 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले. याचा फटका 11 हजार 793 शेतकर्यांना बसला आहे. नुकसानभरपाई अदा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. शासनाने नुकसानभरपाई अदा करण्यासाठी गेल्या महिन्यामध्ये 10 कोटी 41 लाखांचा निधी मंजूर केला. मार्च महिन्याची नुकसानभरपाई वाटप करण्याची प्रक्रिया शासनस्तरावर सुरू आहे.
एप्रिल महिन्यात देखील अवकाळीचे थैमान सुरुच होते. या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने तब्बल 27 हजार 79 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे नुकसान झाले. श्रीरामपूर तालुका वगळता उर्वरित सर्वच तालुक्यांत कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान नेवासा तालुक्यातील 13 हजार 113 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे झाले. या नुकसानीचा आर्थिक फटका 47 हजार 583 शेतकर्यांना बसला आहे. या बाधित शेतकर्यांना नुकसान भरपाईपोटी 46 कोटी 93 लाख निधीची आवश्यकता असल्याचा अहवाल प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविला आहे. मात्र, अद्याप शासनाने नुकसानभरपाईस मंजुरी दिलेली नाही.
नैसर्गिकरित्या जिरायती, बागायती व बहुवार्षिक (फळबागा) पिकांचे नुकसान झाल्यास बाधित शेतकर्यांना हेक्टरी नुकसानभरपाई दिली जाते. शासनाने 27 मार्च 2023 मध्ये नुकसानभरपाई रक्कमेत वाढ केली. आता जिरायती पिकांसाठी 8 हजार 500 रुपये, बागायती पिकांसाठी 17 हजार तर फळबागांसाठी 22 हजार 500 रुपये हेक्टरी अनुदान मिळणार आहे. मात्र, हे अनुदान फक्त 2 हेक्टर क्षेत्रापुरतेच असणार आहे.