अहमदनगर

नाशिक पदवीधर मतदारसंघ : नगर जिल्ह्यात 50 टक्के मतदान

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यातील 58 हजार 283 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, 50.40 टक्के मतदान झाले आहे. मतदारसंघातील 16 उमेदवारांचे राजकीय भवितव्य सोमवारी मतपेटीत बंद झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार न घडता जिल्ह्यात शांततेत आणि सुरळीत मतदान झाले. 2 फेब्रुवारीला नाशिक येथे मतमोजणी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मतपेट्या पोलिस बंदोबस्तात रात्री नाशिकला रवाना करण्यात आल्या आहेत.

पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात 147 मतदान केंद्रांवर सोमवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. या मतदारसंघातून सत्यजित तांबे, शुभांगी पाटील यांच्यासह 16 उमेदवार नशीब अजमावित आहेत. अहमनगर शहरातील न्यू आर्ट कॉलेज व रेसिडेन्सिअल हायस्कूल या दोन ठिकाणी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी सकाळी शहरातील मतदान केंद्रास भेट दिली.नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी रेसिडेन्सिअल हायस्कूलमध्ये मतदान केले.

जिल्ह्यात एकूण 1 लाख 15 हजार 638 मतदार असून, पहिल्या दोन तासांत मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी नव्हती. सकाळी 10 वाजेपर्यंत 8 हजार 334 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर दोन तासांनी 12 वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लावत 13 हजार 448 मतदारांनी मतदान केले. सोमवारी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत एकूण 37 हजार 641 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 28 हजार 478 पुरुष तर 9 हजार 163 महिला मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मतपेट्या अहमदनगर एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदामात जमा करण्यात आल्या. सर्व मतपेट्या दोन बसव्दारे पोलिस पथकांच्या बंदोबस्तात नाशिकला रवाना करण्यात आल्या आहेत.

शेवटच्या दोन तासांत रांगा लागल्या
शेवटच्या दोन तासांत मतदान केंद्रांवर गर्दी वाढली. दोन तासांत 20 हजार 642 मतदारांनी मतदान केले. त्यामुळे सायंकाळी 4 वाजेपर्यंत एकूण 58 हजार 283 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये 43 हजार 206 पुरुष तर 15 हजार 77 महिला मतदारांचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT