अहमदनगर

नगर : ट्रेडिंगच्या नावाखाली 50 लाखांची फसवणूक

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली पन्नास लाख 63 हजारांनी गंडा घालणार्‍या सायबर चोरट्याच्या पोलिसांनी गुजरातमधून मुसक्या आवळल्या. 6 ऑक्टोबर 2022 रोजी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सायबर पोलिसांनी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा छडा लावला.  रौनककुमार रमेशभाई परमार (वय 28, रा.मु.पो.कुवासनाता, विसनगर, जि.मेहसाना, गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तक्रारदार यांची फसवणूक झाली होती.

तक्रारदार यांना चार मोबाईल नंबरवरून गुंतवणूक करण्यासाठी फोन कॉल आले होते. त्यात आदित्य पटेल याच्या 7203874607, दिनकरभाई मेहता याच्या 8940341572, गौतम सहा याच्या 8469181356 व रितेश भाई याच्या 8347334572 या मोबाईल नंबरवरून फोन आले होते. तक्रारदार यांचा विश्वास संपादन करुन आरोपींनी 50 लाख 63 हजारांनी फसवणूक केली होती. फसवणूक करणारे सायबर चोरटे गुजरात मधील मेहसाना जिल्ह्यातील असल्याची खात्री पोलिसांना झाल्यानंतर एक पथक आरोपींच्या शोधासाठी पाठविण्यात आले होते. सायबर पोलिसाचे पथक सलग तीन दिवस आरोपीच्या शोधासाठी गुजरातमध्ये तळ ठोकून होते. स्वतःची ओळख व ठिकाण वेळोवेळी बदलून पोलिसांना गुंगारा देत असतानाच एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

सायबर चोरटे गुजरात, मध्य प्रदेशमधील

शेअर टे्रडिंगच्या नावाखाली नफा मिळवून देण्याचे अमिष देवून फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. हे गुन्हेगार मेहसाणा, सुरत (गुजरात), इंदौर (मध्य प्रदेश) येथे सक्रिय असून त्यांनी अनेकांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

या पथकाने केली कारवाई
पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रतिक कोळी, हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, राहुल हुसळे, दिंगवर कारखेले, मललिक्कार्जुन बनकर, निलेश कारखेले, अरूण सांगळे आदीच्या पथकाने ही कारवाई केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT