राहुरी : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील तब्बल 48 हजार शेतकर्यांना पावसाच्या तडाख्याने नुकसान झाल्याची नोंद शासकीय पंचनाम्यात नमूद आहे. 32 हजार 600 हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीच्या तडाख्यात वाहून गेल्याने शेतकर्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून कोणतीही मदत जाहीर होत नसल्याने ऐन दिवाळी सणातच शेतकर्यांचे दिवाळे निघाले आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा व तत्काळ मदतीची घोषणा करीत दिलासा देण्याची मागणी होत आहे.
राहुरी परिसरात मान्सून हंगामाने त्रस्त शेतकर्यांना परतीच्या पावसानेही यथेच्छ झोडपले. शेतकर्यांच्या बांधावर पोहोचत तहसीलदार फसियोद्दिन शेख व तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले. कृषी सेवक, तलाठी यांच्या पथकाने पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करीत झालेल्या नुकसानीची माहिती वरिष्ठांना दिली.
दरम्यान, राहुरी परिसरात सर्वाधिक नुकसान हे कापूस पिकाचे झाले आहे. 16 हजार हेक्टर क्षेत्रावरील कापूस पीक पावसाच्या पाण्याखाली आल्याने मोठे नुकसान झाले. अनेक शेतकर्यांच्या कापूस पिकाचे बोंड काळवंडले, तर बहुतेक ठिकाणी कापूस पीके पाण्यात वाहून गेल्याचे निदर्शनास आले. यासह सोयाबीन पिकालाही मोठा फटका बसला आहे. राहुरी हद्दीत तब्बल 11.5 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याची नोंद शासकीय दरबारी झाली आहे. यासह बाजरी, चारा पिकांसह भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. एकूण 32 हजार 600 हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीमुळे राहुरी परिसरातील 48 हजार शेतकर्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे.
नुकसानीबाबत तहसीलदार शेख व तालुका कृषी अधिकारी ठोकळे यांच्या माध्यमातून नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यामध्ये शेतकर्यांचे अंदाजे 90 कोटी रुपये पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे.
मान्सून हंगामात पावसाने यथेच्छ झोडपल्याने पूर्वीच शेतकर्यांचे वाभाडे निघाले होते. अनेक शेतकर्यांनी कांद्याची साठवणूक करून दिवाळी सणासाठी नियोजन केले होते. परंतु अतिपावसाने शेतकर्यांच्या साठवणूक केलेल्या कांद्याचेही मोठे नुकसान केले. कांद्याचा पडलेला दर तर दुसरीकडे सडत चाललेला कांदा पाहता शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आले. दिवाळी सणाला कापूस पिकाचे उत्पादनातून खर्च भागविता येईल, अशी अपेक्षा लागली होती. परंतु परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घासही हिरावून घेतला. कापूस पिकासह सोयाबीन पिकाला ऐन काढणीतच पावसाचा मारा सहन करावा लागला. अनेक ठिकाणी वाहत्या नदीप्रमाणे पावसाचे पाणी वाहत असल्याने शेतकर्यांचे पिकेही पाण्यात वाहून गेली.
एकीकडे लम्पी आजाराने थैमान घातल्याने गोधन वाचविण्यासाठी शेतकर्यांना पराकाष्ठा करावी लागली. वाढत्या आजाराने शेतकर्यांना जनावरांवर मोठ्या प्रमाणात औषधोपचाराचा खर्च करावा लागला. त्यामुळे दुग्धधंद्यातही अवकळा आली. दूधउत्पादन घटलेले असताना दुसरीकडे शेतमालाचीही दैना झाली आहे. शेतकर्यांनी 'जगावे की मरावे' अशी अवस्था झालेली असताना सर्व भिस्त शासकीय मदतीवर अवलंबून आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकर्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतील, अशी अपेक्षा लागलेली आहे. दिवाळी सणाला शासनाची मदत न झाल्यास शेतकर्यांच्या दिवाळी सणावर काळोख पसरणार आहे.
ओला दुष्काळ जाहीर कराच : अतुल तनपुरे
रासायनिक खतांच्या दरात भरमसाठ वाढ झाली. केंद्र व राज्य शासनाने शेतकरी विरोधी धोरण पत्कारले. शेतीचे जोडधंद्यातही नुकसान झाले. शेतकरी पूर्वीच कोरोनाने त्रस्त असताना दूध धंद्यालाही लम्पी आजाराने नुकसानीत लोटले. सोयाबीन आयात केल्यानंतर शेतकर्यांच्या पदरी निराशाच आली. कापूस पिकालाही अपेक्षित दर मिळत नसताना अतिवृष्टीच्या तडाख्याने शेतकर्यांचे पिके होत्याचे नव्हते केले आहे. शेतकर्याला जगविण्यासाठी तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून निधी द्यावा, अशी मागणी मराठा महासंघाचे तालुका प्रमुख अतुल तनपुरे यांनी केली.