नगर; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर मर्चन्टस् को-ऑप. बँकेच्या 17 जागांसाठी 23 जणांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. 17 हजार 508 मतदारांपैकी 8 हजार 518 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत 46 मतदान केंद्रावर 48.65 टक्के मतदान झाले. दरम्यान, सोमवारी नगर-कल्याण रस्त्यावरील अमरज्योत मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर 17 जागांसाठी 65 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर 17 जागांसाठी 31 जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले. सत्ताधारी जनसेवा पॅनलेच्या सदस्यांनी सर्वच इच्छुकांशी संपर्क करून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची विनंती केली होती. त्यात काही जण सत्ताधार्यांच्या गळाला लागले.
अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 17 जागांसाठी 23 उमेदवारी अर्ज राहिले होते. दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून सुभाष बायड यांचा एकमेव अर्ज राहिल्याने ते बिनविरोध झाले. दरम्यान, रविवारी नगर शहरसह 46 केंद्रावर मतदान झाले. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी काम पाहत आहेत.