अहमदनगर

जवळ्यात 35 एकर उसाला आग ; शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान

अमृता चौगुले

जवळा : पुढारी वृत्तसेवा :  पारेनर तालुक्यातील जवळा येथे रविवारी (दि.27) गव्हाळी शिवारात जवळा-शिरूर महामार्गालगत असलेल्या शेतातील उभ्या उसाला दुपारी अचानक आग लागली. यामध्ये सुमारे 35 एकर ऊस जळून बेचिराख झाल्याची घटना घडल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जवळा येथील शेतकरी दादाभाऊ बाबाजी सालके, गव्हाळी शिवारातील गट नं 911 व परिसरातील बाळू सालके, संभाजी सालके, नीलेश गणपत सालके, अर्जुन रासकर, संतोष सालके आदी शेतकर्‍यांचा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. तोडणीस आलेला ऊस अचानक आग लागून डोळ्यासमोर होत्याचे नव्हते झाल्याने, शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या ऊस क्षेत्रावरुन विद्युत वाहक तारांचे जाळे पसरलेले असून, खांब ही वाकलेले आहेत.

त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन उसाने पेट घेतला असावा. उसातून आगीच्या ज्वाळासह लोटच्या लोट बाहेर पडू लागले. परिसरातील शेतकरी व रस्त्यावरून जाणारे येणारे नागरिक मदतीसाठी व आग विझविण्यासाठी धावून आले. परंतु, आगीने रौद्ररूप धारण केल्याने कुणाचेही काहीच चालले नाही. जेसीबी यंत्राने मध्ये जाळपट्टे तातडीने तयार करण्यात आले. परंतु, आगीची दाहकता व वारा यामुळे लोट थांबले नाहीत. यात सुमारे तीस ते पस्तीस एकर ऊस जळून खाक झाला.

वर्षभरापासून जीवापाड जपलेला व पूर्ण वाढ होऊन नेमका तोडणीस आलेला ऊस जळून गेल्याने हे नुकसान न भरून येणारे आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन भरपाई द्यावी.
                                       – दादाभाऊ सालके, संतोष सालके, शेतकरी, जवळा

SCROLL FOR NEXT