अहमदनगर

लोणी : 34 कोटी नुकसान भरपाई बँकेत वर्ग : पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे

अमृता चौगुले

लोणी; पुढारी वृत्तसेवा : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडलेल्या 12 हजार 471 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून 33.85 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी सांगितले. मंत्री विखे पा. म्हणाले, राज्यामध्ये दि. 12 डिसेंबर 2022 अखेर 35 जिल्ह्यांतील एकूण 4 हजार 1 संसर्ग केंद्रांमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भाव दिसला आहे. बाधित गावांतील एकूण 3 लाख 75 हजार 576 बाधित पशुधनापैकी एकूण 2 लाख 96 हजार 574 पशुधन उपचाराने बरे झाले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 144.12 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 139.89 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेल्या लसीकरण आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे 100 टक्के गोवंशीय पशुधनास लसीकरण झाले आहे, ना. विखे पा. म्हणाले.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने किटकांच्या नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशु पालक व ग्रामपंचायतींनी मोहीम स्वरूपात राबवाव्या. शासकीय व खासगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दिलेल्या सुधारीत उपचार प्रोटोकॉलप्रमाणे उपचार करावे.

शासकीय अधिकार्‍यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन केल्याचे सांगत सर्व पशुपालकांना ना. विखे पा. यांनी आवाहन केले की, त्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना त्यांच्या पशुधनावर उपचार करून घेण्यास सहकार्य करावे.

क्षेत्रिय अधिकार्‍यांच्या राज्यस्तरीय कृती दलासमवेत झालेल्या दृकश्राव्य माध्यमाद्वारे आढावा बैठकीमध्ये लसीकरण न केलेल्या व लंपी चर्म रोगाने बाधीत नसलेल्या गायींच्या कुठल्याही वयाच्या वासरांना तसेच अद्यापही लसीकरण न झालेल्या गोवंशीय पशुधनास लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. यानुसार, गोपालकांनी त्यांच्या वासरे व गोवंशीय पशुधनास क्षेत्रिय अधिकार्‍यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील गावांमध्ये अशा लसीकरणासाठी मोहीम स्वरूपात पुर्वनिर्धारीत केलेल्या दिवशी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन ना. विखे पा. यांनी केले आहे.

'माझा गोठा, स्वच्छ गोठा' अभियान राबवा..!
रोग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी 'माझा गोठा, स्वच्छ गोठा' अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वसाधारणपणे गोधनास कळपामध्ये चरण्यासाठी पाठविणे व सार्वजनिक पाणवठ्यावर त्यांना पाणी पाजण्यासाठी कळपाने नेण्याच्या गावांमधील दोन्ही पद्धती देखील लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भावास कारणीभूत असल्याचे मत राज्यस्तरीय कार्यदलाने व्यक्त केल्यामुळे महाराष्ट्र राज्य यांनी या दोन्ही पद्धती लंपी चर्मरोग नियंत्रणात येईपर्यंत बंद ठेवण्याबाबत गोपालकांमध्ये जागृती करण्याच्या सूचना ना. विखे पाटील यांनी दिल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT