अहमदनगर

नगर : आषाढीचा एसटीला दोन कोटी लाभ

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  आषाढी एकादशीनिमित्त भाविकांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाने पंढरपूर वारीसाठी 236 जादा बस सोडल्या होत्या. तब्बल 1 लाख 65 हजार 250 भाविकांनी बसने वारी करून पांडुरंगाचे दर्शन घेतले. त्या दहा दिवसांच्या पंढरपूर वारीतून एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभागाला तब्बल 2 कोटी 16 लाख 23 हजार 54 रुपयांचे उत्पन्न मिळाले. एसटी महामंडळाच्या वतीने दर वर्षी पंढरपूर यात्रेला जादा बस सोडण्यात येतात. यंदाच्या यात्रेसाठी अहमदनगर विभागाने चारशे जादा बसचे नियोजन केले होते. 25 जून ते 4 जुलै या दहा दिवसांत बसच्या 1 हजार 849 फेर्‍या झाल्या.

जवळपास 3 लाख 92 हजार 866 किलोमीटरचा प्रवास झाला. या दहा दिवसांच्या कालावधीत रात्रंदिवस बस धावत होत्या. या बसच्या माध्यमातून 2 हजार 842 मुलांनीही पंढरपूर वारी केली. 75 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींना शंभर टक्के मोफत प्रवास आहे. महिला वर्गाला सरसकट 50 टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे पंढरीच्या वारीला देखील मोठी गर्दीॅ झाली होती. अमृत योजनेतील तब्बल 63 हजार 62 भाविकांनी बसच्या माध्यमातून पांडुरंगाचे दर्शन घेतले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पंढरपूर वारीतून एसटी महामंडळाला अधिक उत्पन्न मिळाले असल्याचे अहमदनगर विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.

SCROLL FOR NEXT