नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 14 तालुक्यांत लंपीविरोधात जिल्हा परिषदेने 'लसीकरण, औषधोपचार, गोठ्यात फॉगिंग, शेतकर्यांमध्ये जनजागृतीद्वारे जणू 'मिशन'च हाती घेतले आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 262 जनावरे बाधित झाले असून, यापैकी 13 मृत्यू झाले. तर, 159 जनावरे लंपी रोगातून सुखरूप बाहेर पडल्याचे दिलासादायक चित्र आहे.गेल्या काही दिवसांपासून लंपीचा प्रकोप सुरू आहे. 14 तालुक्यांत 262 जनावरे लंपीने बाधित झालेली आहेत. पाच किमी अंतरावरील परिक्षेत्रात 392 गावांचा समावेश असून, यामधील 4 लाख 49 हजार 654 जनावरांना लंपीचा संभाव्य धोका असल्याने त्यांच्या लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाकडून परिश्रम घेतले जात आहेत. त्यासाठी 3 लाख 50 हजार 900 लस उपलब्ध झालेली आहे. त्याचे वाटपही झालेली आहे. यापैकी काल रविवार सकाळपर्यंत 1 लाख 72 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.
जिल्हा परिषद सीईओ आशिष येरेकर, अतिरीक्त सीईओ संभाजी लांगोरे यांच्यासह मार्गदर्शनात पशुसंवर्धन उपायुक्त सुनील तुंबारे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय कुमकर तसेच जिल्हा परिषदेचे सर्वच विभागप्रमुख लंपीविरोधात तालुकानिहाय मैदानात उतरले आहेत. शेतकर्यांमध्ये जनजागृती करणे, लसीकरणाला वेग देणे, बाधित जनावरांच्या गोठ्यात जाऊन उपचारासाठी सूचना करणे, इत्यादींचा दररोज आढावा घेतला जात आहे. त्यामुळे झेडपीतून 'मिशन लंपी' हाती घेतल्याचे चित्र आहे. या सर्वांच्या प्रयत्नातून बाधित 262 पैकी 159 जनावरांवर वेळेत उपचार केल्याने ती आता पूर्णपणे बरी झाली आहेत. तर 103 जनावरांवर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. कुमकर यांनी दिली.
जिल्ह्यात बाधीत असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी, त्यांच्या संपर्कातील कोणत्याही प्रकारची वैरण, गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्याचे शव, कातडी किंवा कोणताही भाग किंवा अशा प्राण्याचे उत्पादन किंवा असे प्राणी नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करण्यातबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आदेश काढले आहेत. यात, गुरे व म्हशीचा बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्याचे गट करुन किंवा त्यांना एकत्रित करुन कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात आली आहे.