अहमदनगर

13 ते 271 विद्यार्थी; जिल्हा परिषद शाळेचा प्रवास

अमृता चौगुले

सुपा : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या एखाद्या शाळेची पटसंख्या वर्ष-दोन वर्षांतच अवघ्या 13 वरुन 271 पर्यंत गेल्याचे कधी ऐकीवात आहे का? या प्रश्नाचे उत्तर नकारात्मकच असणार. परंतु, हे घडलेय पारनेर तालुक्यातील पवारवाडी या छोट्याशा गावात.
त्याचे झाले असे, की पारनेर तालुक्यातील नगर-पुणे महामार्गावर असणार्‍या जिल्हा परिषदेच्या पवारवाडी शाळेत ज्योती कोल्हे यांची बदली झाली. त्या शाळेत रुजू झाल्या, त्यावेळी शाळेची पटसंख्या अवघी 13 होती. शाळेची अवस्था, वर्गखोल्या, इतर आवश्यक बाबी अगदीच तुटपुंजा! शिक्षिका कोल्हे यांनी प्राधान्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्याकडे लक्ष दिले. या शाळेतील विद्यार्थी राज्य पातळीवर अभ्यासासह खेळातही चमकू लागली. उण्या-पुर्‍या वर्षभरात मुलांच्या अभ्यास आणि खेळात झालेली प्रगती पाहून पालकही आश्चर्य चकीत झाले. ज्या शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत अवघे 13 विद्यार्थी होते, त्या शाळेची पटसंख्या पहिल्याच वर्षात 38 पर्यंत गेली.

अभ्यासाबरोबरच तलवाबाजी, लाठी-काठी, अ‍ॅबॅकसचे प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी हाताच्या बोटांवर गणिते सोडवू लागली होती. कोणतीही स्पर्धा असो, पवारवाडी शाळेचे विद्यार्थी बाजी मारू लागले. हे पाहता, इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील मुलेही जिल्हा परिषदेच्या पवारवाडी मराठी शाळेत दाखल होऊ लागली. पालकांच्या आग्रहास्तव पाचवीचा वर्गही सुरू करण्यात आला. पण प्रश्न होता तो वर्गखोलीचा. शिक्षिका कोल्हे यांनी साद घातली आणि आख्ख्या पवारवाडीने प्रतिसाद दिला. पवारवाडीचे ग्रामपंचायत सदस्य शरद पवार यांनी इमारतीसाठी चार लाख रुपये, तर अशोक वीर, दरेकर या पालकांनी प्रत्येकी 20 हजार रुपये देणगी दिली. आता 13 वरून पटसंख्या 62 झाली होती.

शाळेची प्रगती पाहून परिसरातील ग्रामस्थांनी शिक्षिका कोल्हे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले. श्रीरामपूरच्या ज्ञानोदय बहुद्देशीय संस्थेने त्यांना राज्यस्तरिय पुरस्कार दिला. गुरूमाऊली मंडळानेही आदर्श शिक्षिका म्हणून गौरव केला आणि जिल्हा परिषदेनेही दखल घेत आदर्श शिक्षक पुरस्कार दिला. सुपे परिसरातील रांजणगाव मशिद, रुईछत्तीशी, वाघुंडे, वाळवणे, कामरगाव, पळवे आणि सुप्यातील मुलांनी पवारवाडी शाळेत प्रवेश घेतला. पटसंख्या 110 पर्यंत पोहचली.. आणि ती आता थेट 271 पर्यंत गेली आहे. या शाळेचे 4 विद्यार्थी नवोदयसाठी पात्र ठरले. घरी अभ्यास कसा करावा, याचे धडे पवारवाडी शाळेतच मिळतात. 'अभ्यास कर' असे म्हणण्याची वेळ या शाळेतील कोणत्याही विद्यार्थ्याच्या पालकांवर येत नाही, हे विशेषच!

पवारवाडी शाळेतीत मुलांची गुणवत्ता व दर्जा पाहून आम्ही अंचबित झालो. आता 7 गावांतील मुले या शाळेत येतात. हे पाहून आम्ही ग्रामस्थ जागे झालो. मुलांच्या भवितव्यासाठी आम्ही शाळेला काहीही कमी पडू देणार नाही.
                                                  – शरद आबा पवार, ग्रामपंचायत सदस्य, सुपा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT