अहमदनगर

नगर : महापालिकेत 1283 पदे रिक्त; एकाच अधिकार्‍याकडे अनेक पदांची जबाबदारी

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर महापालिकेत सध्या 1283 पदे रिक्त असल्याने प्रशासनाचे काम कासवगतीने सुरू आहे. रिक्त पदांची भरती झाल्यानंतर प्रशासनाच्या कामाला वेग येणार आहे. लिपिकटंक लेखक, शिपाई, बिगारी ही पदे सर्वाधिक रिक्त आहेत. त्यामुळे ग्राऊंडवर काम करताना अधिकार्‍यांना अडचणी येत आहे. महापालिकेत सर्वच श्रेणीतील अधिकारी व कर्मचार्‍यांची कमतरता आहे.

महापालिका अस्तिवात आल्यानंतर केडगाव, बोल्हेगाव, नागापूर, मुकुंदनगर, सावेडीगाव अशा गावांचा महापालिकेत समावेश झाला. त्यावेळी कर्मचार्‍यांची मोठी संख्या होती. परंतु, त्यानंतर कर्मचारी सेवानिवृत्त झाले तर, अनेक विभागात कर्मचार्‍यांची पदे रिक्त राहिली. परिणामी अनेक पदाचा कार्यकाभार उर्वरित कर्मचार्‍यांना सोपविण्यात आला. चुतुर्थ श्रेणीतील कर्मचार्‍यांची संख्या कमी झाल्याने ग्राऊंड लेव्हला काम करण्यासाठी कर्मचार्‍यांची संख्या कमी पडू लागली.

आस्थापना खर्च जास्त होत असल्याने शासनाने महापालिकेची पदभरती थांबवली होती. सध्या महापालिकेत 2871 पदांना मंजुरी आहे. त्यातील 1616 पदे कार्यरत असून, 1283 पदे रिक्त आहेत. दरम्यान, आता आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी आस्थपना खर्चाची अट शिथिल करून पदभरतीस मान्यता देण्याची मागणी शासनाकडे केली. त्यास शासनाने तत्त्वता मान्यता दिली आहे. परंतु, आता पदभरती कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक विभागात प्रभारी राज महापालिकेत अनेक विभागात प्रभारीराज आहे.

अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर वरिष्ठ लिपिकांकडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला. गेल्या कित्तेक वर्षांपासून तो पदभार संबंधित वरिष्ठ लिपिकांकडेच आहेत. त्यात दोन-तीन विभागाचा पदभारही त्यांच्याकडे असल्याने कामात सुसूत्रता दिसून येत नसल्याची चर्चा आहे.
महत्त्वाची रिक्त पदे नगर रचनाकार 3, मुख्य स्वच्छता निरीक्षक 4, कनिष्ठ अभियंता 20, लिपिक टंकलेखक 118, शिपाई 47, बिगारी/ वॉचमनची 169, वायरमन 21, व्हॉलमन 49, फिटर 15, फायरमॅन 66 सफाई कामगार 346

कर्मचार्‍यांची वानवा
नगरपालिकेची महापालिका अस्तिवात आल्यानंतर उद्यान विभागात 180 कर्मचारी होते. आज महापालिका असतानाही उद्यान विभागात अवघे 40 कर्मचारी आहेत. त्यात शहर वाढले, उद्याने वाढले पण कर्मचारी कमी झाले अशी अवस्था आहे. अशी अवस्था प्रत्येक विभागात आहे. त्यामुळे नागरिक गेल्यानंतर कर्मचारी कधीच जागेवर नसतात. ते बाहेर कामाची पाहणी करण्यासाठी गेलेले असतात, अशीही चर्चा आहे.

वर्गनिहाय कार्यरत व रिक्त पदे
श्रेणी मंजूर पदे कार्यरत रिक्त
प्रथम श्रेणी 38 15 23
द्वितीय श्रेणी 58 15 43
तृतीय श्रेणी 865 328 553
चुतुर्थ श्रेणी 1910 1258 664
एकूण 2871 1616 1283

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT