बोटा : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालक्यात आंबीखालसा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सरपंच बाळासाहेब ढोले यांनी अ. नगर जिल्ह्याला दिशादर्शक असे आदर्शवत निर्णय घेतले. जुन्या रूढी, परंपरा बंद करून विधवा महिलांच्या पुनर्विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 11 हजार रुपये अनुदान तर सरपंच बाळासाहेब ढोले यांच्या स्वनिधीतून 5 हजार रुपये असे स्री सन्मानासाठी 16 हजार रुपये देण्याचे सर्वानुमते ठरले.
या मासिक सभेत आदर्शवत निर्णय घेत महिलांना मानसन्मान मिळावा, समाजात उच्च दर्जा मिळावा, गावात ज्या घरी मुलीचा जन्म होईल, अशा घरी स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी बालकल्याण निधीतून 1 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान दिले जाणार आहे.
यावेळी सरपंच बाळासाहेब ढोले, उपसरपंच रशिद सय्यद, सदस्य दिलीप हांडे, शुभांगी कहाणे, मनिषा गाडेकर, दीपक गावडे, अनिता तांगडकर, अंजली गाडेकर, विलास मधे, अंजना जाधव, सुवर्णा गडगे, सुरेश गाडेकर, अन्सार शेख, संतोष घाटकर, ईश्वर कान्होरे, ग्रामसेवक दारुणकर व ग्रामस्थ उपस्थित होते.