अहमदनगर

11 हजार हेक्टर ‘रब्बी’ ला ढगाळ हवामानाचा फटका

अमृता चौगुले

राहुरी : तालुक्यातील रब्बी हंगामात पेरणी झालेले 11 हजार हेक्टर क्षेत्रावर ढगाळ हवामानाने संकटाची छाया निर्माण झालेली आहे. ऐन हंगामात रब्बीवर आलेली संक्रांत पाहता शेतकर्‍याच्या चेहर्‍यावर चिंतेच्या घड्या दिसत आहे. अवकाळी कोसळल्यास रब्बी पेरण्या पाण्यात वाहून जाण्याच्या भितीने शेतकरी धास्तावला आहे. रब्बी पीकांवर करपा, मावा, भुरी या सारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यास शेतकर्‍यांना औषध फवारणी, खतांचा खर्च डोईजड ठरणार आहे.

ऊस क्षेत्राचे आगार असलेल्या राहुरी तालुक्यात पाण्याच्या कमतरतेचा परिणाम दिसून आला. शेतकर्‍यांनी उसाला फाटा देत कमी पाण्याच्या पिकांना अधिक पसंती दिली. रब्बी काळात शेतकर्‍यांनी कर्ज घेऊन कसेबसे पेरण्याचे नियोजन केले. मान्सून हंगामात पावसाने मारलेली दडी तर दुसरीकडे शासनाच्या दुर्लक्षित भुमिकेने पीकांना मिळालेला कवडीमोल भाव शेतकर्‍यांसाठी संकटाचा ठरला आहे. दूध दरात झालेली घट झाल्यानंतर पीकांवर रोगांचा वाढता प्रादुर्भाव पाहता शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. निसर्गाचा समतोल राखून ऋतुमानानुसार योग्य वातावरण राहिले तर शेतकर्‍यांना निसर्गाकडून दोन्ही हातांनी भरभरून मिळते. परंतु निसर्गच प्रकोपल्यानंतर कसे अस्मानी संकटाला तोंड द्यावे लागते, हे दर्शविताना शेतकर्‍यांची परिस्थिती अत्यंत विदारक झालेली आहे. बदलत्या हवामानाने पीकांचे उत्पादन घटले तर दुसरीकडे पिकांना हमीभाव मिळेना. शेतकर्‍यांसाठी संकटमोचक असणार्‍या पर्यायी दूध धंद्यालाही अवकाळी लागली. दूध दर कोसळले असल्याने शेतकर्‍यांचा उदनिर्वाह रामभरोसे झाला आहे.

राहुरी तालुक्यात ढगाळ हवामानाचे अच्छादन निर्माण झाले आहे. सुर्यदर्शन होतच नसल्याने कांद्याला करपा, हरभर्‍याला पाणी खाणारी अळी तर गहू पिकावर माव्याचा प्रादुर्भाव जाणवत आहे. रब्बी हंगामासाठी राहुरी तालुका कृषी विभागाने 15 हजार 439 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दीष्ट्य ग्राह्य धरले होते. त्यापैकी 77 टक्के उद्दीष्ट्य साध्य होऊन शेतकर्‍यांनी 11 हजार 828 हेक्टर क्षेत्रावर पेरणी केलेली आहे. त्यामध्ये रब्बी ज्वारीचे उद्दीष्टये 3 हजार 252 हेक्टर क्षेत्र असताना शेतकर्‍यांनी 1 हजार 629 हेक्टर क्षेत्रावर पेरणी केलेली आहे. 8 हजार 118 हेक्टर क्षेत्रावर गहू पेरणी अपेक्षित असताना 2 हजार 829 हेक्टर क्षेत्रावर शेतकर्‍यांनी गव्हाला पसंती दर्शविली आहे. 730 हेक्टर क्षेत्र मका पीकासाठी ग्राह्य असताना 518 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आलेली आहे.

3 हजार 337 हेक्टर क्षेत्र हरबरा पिकासाठी ग्राह्य असताना त्यापैकी 1 हजार 431 हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरणी झालेली आहे. 1 हजार 913 हेक्टर क्षेत्रावर कांद्याला पसंती दर्शविली गेली आहे. 2 हजार 6876 हेक्टर क्षेत्रावर चारा पीके तर फळ पीकांना 752 हेक्टर क्षेत्र पसंतीला उतरलेले आहे. याप्रमाणे राहुरी तालुक्यामध्ये आगामी काळातील पाण्याची कमतरतेचे संकट ओळखून शेतकर्‍यांनी कमी पाण्यातील पीकांनाच अधिक पसंती दिल्याचे दिसून आले.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून शेतकर्‍यांवर हवामानाचे वेगवेगळे संकट शेतकर्‍यांपुढे आ वासून उभे राहत असल्याचे दिसले आहे. वर्षभरापूर्वी अतिवृष्टी व सततच्या पावसाने शेतकर्‍यांवर वक्रदृष्टी राहिली. त्या संकटावर मात करीत कसेबसे कर्ज काढत शेतकर्‍यांनी पुन्हा नव्याने उभारी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु मान्सून काळात पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले.

ढगाळ हवामानात पिकांची काळजी घ्यावी
किडीचा प्रादुर्भाव असेल तर इमामेक्टीन बेंझोटए 4.5 ग्रॅम हे प्रति 10 लिटर पाण्यात या प्रमाणे प्रतिएकर 88 ग्रॅम क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5 टक्के, 3 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. जमिनीलगत रोपे कुरताडणार्‍या अळीसाठी क्लोरपायरीफॉक्स 20 टक्के 20 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणे प्रतिएकर 400400 मिली खोडाभोवती आवळणी करणे फायद्याचे ठरेल असा सल्ला तालुका कृषी अधिकारी शिंदे यांनी सल्ला दिला आहे.

SCROLL FOR NEXT