अहमदनगर

108 रुग्णवाहिका कायमच पुणे कॉलवर! नगर तालुक्यातील परिस्थिती

अमृता चौगुले

नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील 108 रुग्णवाहिका दररोज पुणे कॉलवर जात असल्याने, महामार्गावर झालेल्या अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळत नाही. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाने रुग्ण पुण्याला हलविण्यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

नगर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मोफत सेवा असलेल्या 108 रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. मात्र, नगर तालुक्यातील रुग्णवाहिका दररोज पुणे येथे कॉलसाठी जात आहेत. तालुक्यात जेऊर, चिचोंडी पाटील, रुई, केडगाव, जिल्हा सरकारी रुग्णालय, भिंगार येथे रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. परंतु, या रुग्णवाहिकांना दररोज जिल्हा सरकारी रुग्णालयातून पुणे येथे पाठविण्यात येते. त्याचवेळी परिसरात अपघात झाल्यास रुग्णाला वेळेवर उपचार मिळत नाहीत.

अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांचे प्राण गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे चिचोंडी पाटील, तसेच जेऊरच्या ग्रामस्थांनी रोष व्यक्त करीत 108 रुग्णवाहिका पुणे येथे पाठवू नये, अशी मागणी केली आहे. याबाबत संबंधित अधिकार्‍यांशी पत्रव्यवहार करून आंदोलनाचा इशारा दिला होता.

जेऊर ग्रामसभेत रुग्णवाहिका पुणे येथे पाठवू नये, असा ठराव देखील घेण्यात आला. परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. जिल्हा रुग्णालयातून दररोज रुग्ण पुणे येथे हलविण्यासाठी तालुक्यातील 108 रुग्णवाहिकांचा वापर केला जातो. रुग्णवाहिका वारंवार पुणे कॉलवर जात असल्याने सर्वच रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयातच ठेवा, अशा संतप्त भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. अपघात झाल्यानंतर सुमारे 50 ते 60 किलोमीटर लांब असणारे कॉल रुग्णवाहिकांना देण्याची वेळ येते. तोपर्यंत अपघात ग्रस्त रुग्णाची काय अवस्था होत असेल, याची कल्पना संबंधितांना नाही का? असा सवाल करण्यात येत आहे.

रुग्णवाहिका नियमित पुणे येथे कॉलवर जात असल्याने परिसरात अपघात झाल्यास रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. तालुक्यातील एकही 108 रुग्णवाहिका पुणे येथे कॉल वर पाठवू नये.
                                                 -अच्युत गाडे, संभाजी ब्रिगेड, भिंगार

जेऊर येथील रुग्णवाहिका कायमस्वरूपी पुणे येथे पाठविली जाते. ग्रामसभेचा ठराव, पत्रव्यवहार करून उपयोग झाला नाही. रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयाने स्वतंत्र यंत्रणा राबवावी.
                                           – बंडू पवार, माजी उपसरपंच, जेऊर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT