अहमदनगर

100 दिवसांत 10 हजार घरकुले पूर्ण; नगर झेडपी राज्यात पहिली

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : अमृत महाआवास अभियानात नगरची घोडदौड सुरूच आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाचा यशस्वी पाठपुरावा आणि लाभार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद यांमुळे अवघ्या 100 दिवसांच्या कालावधीत तब्बल 10 हजार घरकुलांची कामे पूर्ण करणारी नगर जिल्हा परिषद ही राज्यात पहिली ठरली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून नगर जिल्ह्यासाठी 60 हजार 667 घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्टे आहे. दि. 20 नोव्हेंबरपर्यंत यातील 38 हजार घरकुले पूर्ण झालेली होती.

तर 48 हजार घरकुले अपूर्ण होती. ही घरकुले 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्यासाठी शासनाने अमृत महाआवास अभियान हाती घेतले आहे. संपूर्ण राज्यातच अशाप्रकारे हे अभियान सुरू झाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी या अभियानाचा मायक्रो प्लॅन बनविला होता. सीईओ येरेकर यांनी प्रकल्प संचालक सुरेश पठारे, सहायक अभियंता किरण साळवे, सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी यांच्यासमवेत वेळोवेळी बैठका घेतल्या.

यातून लाभार्थ्यांकडून अपूर्ण घरे पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पनाही राबविल्या, कधी कायद्याचा धाक, तर कधी प्रत्यक्षात कारवाईचा बडगा उगारून येरेकर यांनी गांभीर्याने हा विषय हाताळला. तालुक्यांसह गावोगावचे दौरे केले, थेट ग्रामसेवकांशी संपर्क करून अडीअडचणी जाणून घेतानाच 'कामात हलगर्जीपणा चालणार नाही' असा सज्जड दमही भरला. त्यामुळे प्रशासनानेही रात्रीचा दिवस करून ज्यांची घरे अपूर्ण आहेत, अशा लाभार्थ्यांशी संवाद साधला. पहिला हप्ता उचलला असल्याने ती शासनाची फसवणूक असून, गुन्हे दाखल होऊ शकतात, असा इशाराही दिला.

तर काही लाभार्थ्यांशी घरकुलाची रक्कम मागे जाईल, पुन्हा घरं मिळणार नाही, मुला-बाळांचा विचार करा, असा भावनिक संवादही साधला. या सर्व प्रयत्नांचे फलित म्हणून नगरचा राज्यात डंका सुरू झाल्याचे दिसत आहे. दि. 20 फेब्रुवारी ते दि. 4 मार्च या 105 दिवसांच्या कालावधीत नगर जिल्हा परिषदेने तब्बल 10 हजार 199 घरकुले पूर्ण करून पहिले स्थान टिकवले आहे. दुसर्‍या स्थानावर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यांच्या तुलनेत नगर 4 हजाराने पुढे आहे. त्यामुळे नगर जिल्हा परिषदेचे सीईओ येरेकर यांच्यासह त्यांच्या टीमचे जि.प. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, राजश्रीताई घुले, मिराताई शेटे, हर्षदाताई काकडे, काशीनाथ दाते, जालिंदर वाकचौरे, संदेश कार्ले, धनराज गाडे आदींनी अभिनंदन केले आहे.

राज्यपुरस्कृत योजनेत नगर दुसर्‍या स्थानी!
राज्य पुरस्कृत योजनेत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना इत्यादीचा समावेश आहे. या योजनेतून नगरला 32 हजार 969 घरकुले पूर्ण करण्याचे उद्दीष्ट होते. 20 नाोव्हेंबर 2022 रोजी 27 हजार 769 घरे पूर्ण झाली होती. त्यानंत्तर उवर्रीत घरकुले पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली. 4 मार्चच्या आकडेवारीनुसार 3143 घरकुले पूर्ण करून नगरने येथे द्वितीय स्थानावर जागा मिळवली.

पोलिसांची मदत; घरकुलांना गती!
ज्यांची घरकुले अपूर्ण आहेत, अशा लोकांना पोलिसांचे फोन गेले. तुम्ही शासनाची पहिल्या हप्त्याची 15 हजारांची रक्कम उचलली आहे, मात्र घर काही बांधले नाही. त्यामुळे ही फसवणूक आहे. तुम्ही घरकुलाचे काम तत्काळ सुरू करा, अन्यथा फौजदारी होऊ शकते, असा सज्जड दम भरताच अनेकांनी कामे सुरू केली आणि पूर्णही केली.

जिल्ह्याचे काम चांगले : शालिनीताई विखे
अमृत महाआवास अभियानात अधिकार्‍यांनी अपूर्ण घरकुलांच्या पूर्णत्वासाठी चांगला पाठपुरावा केला, पैसे परत जावू नये म्हणून लाभार्थ्यांनीही मनावर घेतले. सीईओ, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सर्व अधिकारी, गावोगावचे सरपंच, अशा सर्वांच्या प्रयत्नातून आज जिल्हा घरकुल उभारणीत राज्यात नंबर एकवर आहे. पुढेही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी बरोबर काम केल्यास सर्वच योजना यशस्वी होतील. चांगल्या पद्धतीने जिल्ह्यात काम झाले आहे. असेच काम भविष्यातही करावे, अशी अपेक्षा जि.प. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केली.

महाआवास (टॉपटेन)
नगर 10199
यवतमाळ 6672
गोंदिया 6645
धुळे 6114
अमरावती 6091
जळगाव 5776
नाशिक 5669
नांदेड 5334
नंदुरबार 4195
चंद्रपूर 4191

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT