श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील गार शिवारातील शिपलकर वस्तीवर काल (दि. 3) मध्यरात्री साडेबारा वाजता चार चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत उत्तम शिपलकर हे गंभीर जखमी झाले आहेत. चोरट्यानी या परिसरात तीन ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला, तर दोन दुचाकी चोरून नेल्या आहेत. गार शिवारातील शिपलकर वस्ती येथे उत्तम शिपलकर व त्यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. जेवण करून शिपलकर कुटुंबीय झोपी गेले.
मध्यरात्री साडेबारा वाजता चार चोरट्यांनी घरात प्रवेश करीत धारदार शस्त्राचा धाक दाखवून रोख रक्कम व सोन्याचा ऐवज देण्याची मागणी केली. त्याच वेळी उत्तम शिपलकर यांनी चोरट्याना विरोध केल्याने चोरट्यानी त्यांना मारहाण करीत धारदार शस्त्राचा त्यांच्या तोंडावर वार करीत जखमी केले. त्यानंतर चोरट्यानी पलायन करीत इतर दोन ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला. शिपलकर वस्ती येथून दोन दुचाकी चोरुन नेल्या आहेत. दरम्यान, घटनेबाबत श्रीगोंदा पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग व पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेत तपासाची चक्रे फिरवली.