कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या रस्ते विकासाला निधी मिळावा, यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन समितीकडून 3054 अनुदान योजने अंतर्गत रस्त्यांसाठी 1 कोटी 80 लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आ. काळे यांनी अनेक महत्वाच्या रस्त्यांचे प्रश्न सोडविले आहेत. मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी 140 कोटी, कोपरगाव शहरातील रस्त्यांसाठी 5.35 कोटी तसेच 'एन. एच. 752 जी' या कोपरगाव जवळून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावरील सावळीविहीर ते कोपरगाव रस्त्यासाठी 178 कोटी व विविध रस्त्यांवरील पुलांसाठी 29.47 कोटी निधी आणला आहे. तरी देखील मतदार संघाच्या सर्वच रस्त्यांचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरुच असून त्या पाठपुराव्यातून मतदार संघातील रस्त्यांसाठी 1 कोटी 80 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
यामध्ये कोपरगाव तालुक्यातील घोयेगाव येथील घोयेगाव- उक्कडगाव रस्ता, धोत्रे -वारी, अंजनापूर कमान ते संगमनेर रोड, चांगदेव गव्हाणे वस्ती, पुणतांबा रेल्वे गेट ते योगीराज चांगदेव महाराज मंदिर कमान, कासली पाटी ते कासली गाव, चितळी रोड ते शिवाजी साबदे घर या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.
या शिवाय मुर्शतपूर कैलास शिंदे घर ते किरण देवकर घर , रवंदे येथील जिल्हा परिषद शाळा ते महालखेडा (काळधोंडी नदी), पोहेगाव बुद्रुक येथील बाळासाहेब वेताळ हॉटेल ते मयुरेश्वर शाळा, या रस्त्यांच्या खडिकरणासाठी हा निधी मंजूर झाला आहे. मतदार संघातील उर्वरित रस्त्यांसाठी देखील निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरु असून या रस्त्यांसाठी लवकरात लवकर निधी आणून या रस्त्यांचाही विकास करणार असल्याचे आ. काळे यांनी सांगितले.