कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या भागांत गेल्या आठवड्यापासून सुरू असलेला मुसळधार पाऊस किमान आठवडाभर सुरूच राहणार आहे. हवामान विभागाने कोकणातील या भागासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे, तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' कायम आहे.
या भागात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस बरसणार आहे. कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर पाऊस कायम (ऑरेंज अलर्ट) आहे, तर पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर केवळ २१ जुलै रोजीच मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणात गेल्या आठवड्यापासून अतिवृष्टी सुरू आहे. विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील सर्वच नद्या, नाले, ओढे यांना महापूर आलेला आहे. मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
सध्या दक्षिण गुजरात ते उत्तर केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असून, त्याची तीव्रता कायम आहे. तसेच बंगालच्या उपसागरापासून ते दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र कार्यान्वित असून, ते दक्षिण छत्तीसगड व विदर्भावर स्थिर झाले आहे. या स्थितीमुळे कोकणात अतिवृष्टी, तर विदर्भात विजांचा कडकडाट, वादळी वारे तसेच मेघगर्जनेसह पाऊस बरसणार आहे.
शहरात मंगळवारी (दि. १६) दुपारी दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. हुडको भागासह अनेक ठिकाणी घरे व दुकानांत पावसाचे पाणी घुसल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले. दोन तासांत सुमारे २५ ते ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
बाजार समितीकडून पाण्याचा मोठा लोंढा विंचूर चौफुलीकडे वाहत असल्याने काही काळ वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता. संपूर्ण तालुक्यातही या पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागात समाधान व्यक्त होत आहे. हुडको भागामध्ये रस्त्याची उंची अधिक, तर जुनी घरे रस्त्याच्या खाली गेल्याने घरांसह दुकानांमध्ये पाणी घुसले.
या भागातील एका रेशन धान्य दुकानातसुद्धा पाणी शिरून काही धान्याचे नुकसान झाले. पावसामुळे शहर परिसरातील पिकांना मोठी उभारी मिळणार आहे. ग्रामीण भागात अजूनही पिकांच्या उभारीसाठी व टंचाई दूर करण्यासाठी मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. अधूनमधून पडणाऱ्या पावसावर पिके जमोत असली, तरी जोरदार पावसाची मात्र प्रतीक्षा आहे.