नागपूर / मुंबई / नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट होत असताना महाराष्ट्रात संपूर्ण अनलॉक जाहीर करण्याची तयारी चाललेली आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत शुक्रवारी दिले. तथापि, केंद्र सरकार आणि कोव्हिड टास्क फोर्सच्या सल्ल्यानंतरच यासंदर्भातील निर्णय जाहीर केला जाईल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. (Maharashtra Unlock)
आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले, नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही राज्य 'अनलॉक'च नव्हे तर 'मास्क फ्री'ही करण्याबाबतची चर्चा दोन्ही अंगांनी केलेली आहे. महाराष्ट्रात लवकरच संपूर्ण अनलॉक जाहीर करण्यासाठी केंद्र आणि राज्य कोव्हिड टास्क फोर्सकडून सल्लाही मागितला गेला आहे.
राज्यात आता कुठलेही आणखी निर्बंध लागू करण्याची गरज नाही. निर्बंधांमध्ये आणखी सवलतीचे संकेतही टोपे यांनी दिले. लोकांनी आपापल्या पातळीवर उत्स्फूर्तपणे प्रतिबंधात्मक, बचावात्मक उपायांचे पालन करायला हवे, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. तिकडे नागपुरात, महाराष्ट्र अनलॉकच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही दिली.
शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी सांगितले, तिसर्या लाटेत मुंबईपासून कोरोना संक्रमणाला सुरुवात झाली होती. मुंबईनंतर राज्यभर कोरोनाचे संक्रमण वाढले. आता सर्वप्रथम मुंबईतच रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे मुंबईत निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. टप्प्याटप्प्याने राज्याच्या इतर भागांतही कार्यवाही होईल. निर्बंध शिथिल होत असले तरी मास्क मुक्ती मात्र इतक्यात होणार नाही, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
या महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्र पूर्णत: अनलॅाक होण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात येत आहे. नागपुरात मात्र आठवडाभरासाठी निर्बंध तसेच राहणार आहेत. अनलॅाक करताना चौथ्या लाटेचीही चिंता आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे, असेही मंत्री वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात सांगितले, जेव्हा मास्क मुक्तीचा निर्णय होईल तेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेऊन तो रीतसर व अधिकृतपणे जाहीर करू. जोवर कोरोना आहे, तोवर मास्क वापरलाच पाहिजे.
बुधवारच्या तुलनेत गुरुवारी महाराष्ट्रात दैनंदिन रुग्णसंख्येत 1,035 ने घट नोंदविण्यात आली. बुधवारी राज्यात 7,142 नवे रुग्ण आढळले होते. गुरुवारी त्यात घट होऊन दैनंदिन रुग्णसंख्या 6,248 नोंदविली गेली. मुंबईत सतत चौथ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्या 500 हून कमी आहे. गुरुवारी या महानगरात 429 नवे रुग्ण समोर आले. राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली असून ही संख्या आता 70 हजारांवर आली आहे.