हरिष पाटणे, सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष उफाळणार आहे. राष्ट्रवादीत झालेल्या दुफळीनंतर सातारा जिल्ह्याच्या दौर्यावर आलेल्या शरद पवारांचे जसे दणक्यात स्वागत झाले. तसेच स्वागत अजित पवारांचे कोल्हापूरला जाताना सातारा जिल्ह्यात करण्याची तयारी अजित पवार गटाने केल्याने संघर्षाला धार चढणार आहे. दोन्ही पवारांच्या या भांडणात निष्ठावंत कार्यकर्त्यांची मात्र घालमेल वाढली आहे.
सातारा जिल्हा हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. काँग्रेस विचारांच्या या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर शरद पवार यांनी चांगलेच बस्तान बसवले. राज्यात कुठेही जेवढे यश मिळाले नाही तेवढे यश शरद पवारांना सातारा जिल्ह्यात मिळाले. स्थापनेवेळीच 9 आमदार व 2 खासदार देणारा सातारा जिल्हा पवारांसाठी बालेकिल्ला ठरला. शरद पवार यांनी सातारा जिल्ह्याची धुरा अजित पवार यांच्या हातात दिल्यानंतर त्यांनीही सातारा जिल्ह्यातील 11ही तालुक्यांमध्ये आपला वट निर्माण केला.
अजित पवार सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी अत्यंत वेगाने पक्ष संघटना तर वाढवलीच; मात्र विकास कामेही दर्जेदार केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वतःचा स्वतंत्र गटही याच कालावधीत अजितदादांनी निर्माण केला, पुढे तो वाढवलाही. अलीकडच्या काही वर्षांत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिरकाव केला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले बलाढ्य नेते आज सातारा जिल्ह्याची भारतीय जनता पार्टी झाली आहे. एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये सामना रंगला होता तेव्हा अचानक बॉम्बस्फोट झाल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी माजली. सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर कमांड असलेल्या अजितदादांनी थेट सत्तेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सातारा जिल्ह्यात उघड- उघड दोन गट पडले. अजितदादा सत्तेत गेल्यानंतर हक्काचा सातारा जिल्हा ताब्यात ठेवण्याच्या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी सातारा जिल्ह्यात जोरदार एंट्री केली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील समाधिस्थळावरून स्वकीय व विरोधकांविरोधात एल्गार पुकारला. आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकर या तीन माजी मंत्र्यांनी शरद पवारांना साथ दिली. शरद पवारांची जोरदार रॅलीही सातार्यातून निघाली. या रॅलीत सहभागी राहिलेले आ. मकरंद पाटील मात्र दुसर्याच दिवशी अजितदादा पवार गटात सामील झाले.
सत्तेत सहभागी झाल्यापासून अजितदादा एकदाही सातार्यात आलेले नाहीत. दि. 10 सप्टेंबर रोजी त्यांची कोल्हापूर येथे सभा आहे. कोल्हापूर येथे सभेला जाण्यासाठी ते राष्ट्रीय महामार्गावरून सातार्यातून जाणार आहेत. अजितदादा प्रथमच सातार्यावरून जाणार असल्याने त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यासाठी राष्ट्रवादीचा दुसरा गट सरसावला आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर या प्रक्रियेत अग्रभागी आहेत. आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण हेही अजितदादांच्या स्वागताची जय्यत तयारी करत आहेत. महामार्गावर जे स्वागत शरद पवारांचे झाले, तेवढ्याच दणक्यात अजित पवारांचे स्वागत करण्याचे नियोजन आहे. उघड उघड दोन पवार गटांत संघर्षाची चिन्हे आहेत. कोणाचे स्वागत जोरात होणार यासाठीही ईर्ष्या आहे. त्यातून कोणता पवार गट मोठा हे दाखवले जाणार आहे. आ. रामराजे नाईक-निंबाळकर, आ. मकरंद पाटील यांच्यासाठी हा प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे.