Latest

पवार यांचे यश-अपयश

मोहन कारंडे

– सुरेश पवार

1978 मध्ये शरद पवार यांनी वसंतरावदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडले आणि तेव्हापासून त्यांच्या कात्रजच्या घाटाचा प्रयोग सुरू झाला. पुढे 45 वर्षांत सातत्याने त्यांच्या दुटप्पीपणाचा प्रत्यय येत राहिला आणि त्यामुळेच त्यांचे महाराष्ट्रातील यश मर्यादित राहिलेच; पण अन्य राज्यातही ते स्वीकारार्ह ठरले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. गेल्या साठ वर्षांपासून राजकारणात आणि 56 वर्षांपासून संसदीय क्षेत्रात वावरणार्‍या ज्येष्ठ नेते शरद पवार यांना हा जबरदस्त धक्का म्हटला पाहिजे. खुद्द त्यांचे पुतणे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे निकटवर्तीय या महाबंडात सहभागी आहेत, यावरून या घडामोडीची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात येते. त्यांच्या सहा दशकांच्या राजकीय वाटचालीतील हे सर्वात मोठे अपयश अशीच या घटनेची नोंद होईल. पवार यांच्या या जबरदस्त अपयशाच्या निमित्ताने त्यांच्या एकूणच राजकीय वाटचालीतील यश-अपयशाचा लेखाजोखा घेणे संयुक्तिक ठरेल. शरद पवार हे कर्तबगार आहेत. त्यांचे प्रशासन कौशल्य वादातीत आहे. त्यांची निर्णय क्षमता, आकलन शक्ती याविषयीही दुमत नाही. राजकारणाप्रमाणे साहित्य, कला, सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचा वावर असतो. त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. हे सारे गुणविशेष असूनही त्यांना देशपातळीवर सोडाच; पण महाराष्ट्र राज्यातही म्हणावे तसे यश मिळालेले नाही. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत 'कात्रजचा घाट' हा त्यांचा हुकमी डाव ठरला, तोच त्यांना नडला. त्यांच्या विश्वासार्हतेवर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले तेच त्यांच्या अपयशाचे कारण ठरले.

देशपातळीवर त्यांच्या बरोबरीच्या अनेक नेत्यांनी आपापल्या राज्यात स्वबळावर सत्ता मिळवली. त्यांच्या नंतरच्या पिढीतही अनेकांनी आपापल्या राज्यात ठसा उमटविला. सत्ता मिळवली. खुद्द महाराष्ट्रात त्यांच्यानंतर राजकारणात आलेल्या आणि काँग्रेससारख्या भरभक्कम पक्षाची पार्श्वभूमी नसलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पवारांपेक्षा अधिक राजकीय यश मिळवले आणि त्यांच्या पश्चातही त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. बाळासाहेब ठाकरे यांनी एक परंपरा निर्माण केली. शरद पवार यांना असे काही यश मिळवता आले नाही.

नवी दिल्लीत स्थापन झालेल्या आप पक्षाने पंजाबातही सत्ता मिळवली. तशी किमया त्यांना शेजारच्या गोवा राज्यात करता आली नाही. किंबहुना महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांतच त्यांच्या पक्षाला यश मिळाले. (त्यातही त्यातील काहीजण हे स्वबळावरही निवडून येण्याची क्षमता असणारे आहेत.) शरद पवारांनी विधानसभा/लोकसभा निवडणुकीत जे यश मिळवले, त्यात पश्चिम महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. काँग्रेस पक्षाचे सहानुभूतीदार आणि मतदार जसे मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्यांक समाजातील आणि गोरगरीब, सामान्य वर्गातील आहेत तशी मतदार आणि सहानुभूतीदार यांची पवारांच्या पक्षाला मिळणारी पसंती मर्यादित आहे, असे निकालावरून स्पष्ट झाले आहे. पवार यांची ही मर्यादा आहे. 1978 मध्ये पुलोद प्रयोगावेळी पवार यांच्याबरोबर काँग्रेसमधून 37 आमदार बाहेर पडले होते; पण पुलोदचे सरकार बरखास्त होताच त्यापैकी बहुतांश आमदारांची स्वगृही परतण्यासाठी रीघ लागली. त्यानंतर 1980 मध्ये पवारांनी एस काँग्रेस या आपल्या पक्षातर्फे लोकसभा, विधानसभा निवडणुका लढवल्या. तेव्हा त्यांचे 47 आमदार निवडून आले आणि एक खासदार विजयी झाला. 1985 मध्ये त्यांचे 54 आमदार झाले. 1986 मध्ये त्यांनी स्वगृही प्रवेश केला. 1990 ची विधानसभा निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली. काँग्रेस पक्षाला स्वबळावर, निर्णायक बहुमताने सत्ता प्राप्त करता आली; मात्र 1990 मध्ये काँग्रेसला विधानसभेत 141 जागा मिळाल्या. साधे बहुमतही मिळाले नाही. 1995 मध्ये विधानसभा निवडणूक झाली, तेव्हा पवारच मुख्यमंत्री होते. त्यावेळी काँग्रेसची वाताहतच झाली. काँग्रेसला केवळ 80 जागा मिळाल्या. एकसंघ काँग्रेसला आजपर्यंत एवढे दारूण अपयश आले नव्हते. या निवडणुकीत काँग्रेसचे अनेक उमेदवार पडले, ते बंडखोरीमुळे. 45 अपक्ष निवडून आले. या बंडखोरीमागे बोलविते धनी कोण, हे जाणकारांना चांगलेच माहीत आहे.

1999 मध्ये पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला, तरी त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 75 जागा मिळवल्या, तर पवारांना 58 जागा मिळाल्या. 2004 मध्ये प्रथमच त्यांनी सत्तरी ओलांडली; पण 2009 मध्ये 62, 2014 मध्ये 41 आणि 2019 मध्ये 54 जागा त्यांच्या पदरात पडल्या. जेव्हा दोन्ही काँग्रेस पक्ष एकत्र लढले, तेव्हा राष्ट्रवादीच्या जागात वाढ झाली, हे लक्षणीय आहे. या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊपेक्षा अधिक खासदार कधीही निवडून आले नाहीत.

शरद पवार यांची अशी वाटचाल असताना त्यांच्या पिढीचे मुलायमसिंग यादव आणि लालूप्रसाद यादव यांनी मात्र जोरदार घोडदौड करीत भारतीय राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केले. 1993 आणि 2003 मध्ये मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशात सत्ता संपादन केली. नंतर त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांनी 2014 मध्ये 224 जागा जिंकत उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रिपद पटकावले. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनीही 1995, 1997, 2002 असे तीन वेळा काही काळ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिला. त्यानंतर 2007 ते 2012 या काळात त्यांनी स्वबळावर सत्ता मिळवीत मुख्यमंत्रिपद प्राप्त केले. लालूप्रसाद यादव यांनी बिहारमध्ये 1990 आणि 1995 मध्ये जनता दलाचे मुख्यमंत्री म्हणून सत्ता संपादन केली. जनता दलात फूट पडल्यावर लालू प्रसाद यांनी राष्ट्रीय जनता दलाची स्थापना केली. 2000 मध्ये राजदने सत्ता मिळवली आणि लालूंच्या पत्नी राबडीदेवी बिहारच्या मुख्यमंत्री झाल्या. सध्याही बिहारात लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव आणि नितीशकुमार यांचेच सरकार आहे.

पुढील पिढी पडली भारी

पवार यांच्या बरोबरीच्या नेत्यांनी त्यांच्यापुढे मजल मारली, तर नंतरच्या पिढीनेही त्यांच्यापुढे घोडदौड केली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच पश्चिम बंगाल हे मोठे व महत्त्वाचे राज्य. तिथे दीर्घकाळ म्हणजे सुमारे चाळीस वर्षे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची एकछत्री सत्ता होती. त्या विरोधात उभे राहणे काही सामान्य काम नव्हते; पण काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस पक्ष स्थापन केला आणि कट्टर, जहाल, मार्क्सवाद्यांशी सामना केला. एवढेच नव्हे, तर त्यांनी 2011 मध्ये मार्क्सवाद्यांचा बालेकिल्ला जिंकला. मुख्यमंत्रिपद प्राप्त केले. त्यानंतरही कडवा संघर्ष करीत विधानसभेत 200 च्या आसपास जागा मिळवीत 2016 आणि 2021 मध्ये सत्ता मिळवली. मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक केली. शरद पवारांपेक्षा 15 वर्षांनी लहान असलेल्या ममतादीदींना जमले, तशी किमया पवारांना कधीच जमली नाही.

नव्या पिढीचीही बाजी

अलीकडील वीस वर्षांत राजकारणात उतरलेल्या नवीन पिढीनेही पवारांच्या तुलनेत मोठी बाजी मारली आहे. पवार यांच्यापेक्षा ज्येष्ठ असलेले बिजू पटनायक यांचा भारतीय राजकारणात दबदबा होता. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव नवीनकुमार पटनायक यांनी ओडिशा राज्यावर आपली मजबूत पकड ठेवली आहे. 2000 पासून सलग पाचवेळा त्यांनी ओडिशा राज्यात बिजू जनता दल या आपल्या पक्षाची सत्ता अबाधित राखली. 2014 मध्ये देशभर मोदी लाट असताना ओडिशामध्ये नवीनकुमार यांनी 20 खासदार निवडून आणले होते. पवारांना याच्या निम्म्यानेही खासदार विजयी करता आले नव्हते. तेलंगणात के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाने 2014 आणि 2018 मध्ये सत्ता मिळवली आणि आता चंद्रशेखर राव यांनी भारत राष्ट्र समिती असा पक्षाचा विस्तार करून महाराष्ट्र, कर्नाटकात चंचूप्रवेश केला आहे. आंध्र प्रदेशातील काँग्रेस नेते वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र जगन मोहन रेड्डी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून वाय. एस. आर. काँग्रेस पक्ष स्थापन करून आंध्र विधानसभेत 2019 मध्ये बहुमत मिळवले. आंध्रातून 22 खासदार निवडून आणले. अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना करून 2015 आणि 2020 मध्ये दिल्ली काबीज केली आणि दोन वर्षांतच पंजाबवरही झेंडा लावला.

शरद पवार यांच्या तुलनेत त्यांचे समवयस्क नेते आणि नवोदित नेते यांची कामगिरी कितीतरी सरस आहे. शरद पवारांना तसे यश मिळवता आले नाही. साठ वर्षांचा प्रचंड अनुभव काही कामाला आला नाही. ज्या ज्या नेत्यांनी आपापल्या राज्यात पकड ठेवली, त्यांनी जनतेचा, कार्यकर्त्यांचा विश्वास मिळवला. त्या बळावरच त्यांना यश मिळत गेले. शरद पवार यांना तशी विश्वासार्हता मिळाली नाही. ती त्यांची मर्यादा ठरली. आता तर त्यांच्या पक्षात उभी फूट पडली आहे. त्यामुळे त्यांच्यापुढील आव्हान आणखी कडवे झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT