Latest

शरद पवार यांचा ‘कात्रजचा घाट’?

दिनेश चोरगे
  • सुरेश पवार

'लोक माझे सांगाती' हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांचे आत्मचरित्र. 'कात्रजचा घाट' या शब्दप्रयोगाबद्दल त्यांनी आपले मत त्यात नोंदवले आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्यांना आपल्या डावपेचाचा थांगपत्ता लागू न देणे ही हातोटी राजकारणात असावी लागते. माझ्याकडे ती आहे आणि मी तिचा वापर खुबीने करत आलो आहे, असे त्यांनी म्हटले आहे. सध्या ज्या काही घडामोडी होत आहेत, चर्चा, तर्क होत आहेत, त्यामागे बोलविते धनी तेच असल्याचे म्हटले जाते. आता ते कोणाला कात्रजचा घाट दाखवणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

शरद पवार यांचे पुतणे विरोधी पक्षनेते अजित पवार गेला आठवडाभर चर्चेत आहेत. आधी ते अचानक 'नॉट रिचेबल' झाले आणि सोमवारी त्यांनी मुंबईतील आपले सारे कार्यक्रम रद्द केले. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीची पुनरावृत्ती होणार, अशी जोरदार चर्चा सुरू झाली. अजित पवारांच्या अशा कोणत्याही कृतीवर यापूर्वी शरद पवारांनी अंकुश ठेवलेला आहे. पण यावेळी मात्र ते 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये दिसत नाहीत. त्यामुळे बदलत्या संदर्भात शरद पवार यांच्या इशार्‍यावरच काही नवी खेळी सुरू झाली असावी, अशी जोरदार चर्चा आहे.
1978 सालच्या 'पुलोद'च्या प्रयोगातून शरद पवार आपले रंग कसे झटक्यात बदलतात, हे दिसून आले आहे. 1980 मध्ये ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण आय काँग्रेस प्रवेशाच्या तयारीत असताना, पवार आपल्यासमवेत यावेत, अशी त्यांची इच्छा होती. आपण पवारांसमवेत आय काँग्रेस पक्षात गेल्यास आपल्याला चांगले पद, मंत्रिपद मिळेल, ही त्यांची अपेक्षा होती. पण शरद पवारांनी ऐनवेळी घूमजाव केले. चव्हाणांसोबत त्यांनी आय काँग्रेस पक्षात प्रवेश केला नाही आणि चव्हाण यांना त्याची किंमत भोगावी लागली. त्यांची अवहेलना झाली. त्यांना वित्त आयोगासारखे पद देऊन त्यांची बोळवण करण्यात आली.

त्यानंतर 1999 मध्ये सोनिया गांधी यांना पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत यश मिळण्याची चिन्हे दिसताच पवारांनी पगडी फिरवली. सोनिया यांच्या विदेशी मुळाचा मुद्दा उपस्थित करीत त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतंत्र चूल मांडली. तत्पूर्वी, संसद भवनाच्या पायरीवर उभे राहून त्यांनी सोनिया गांधींना जाहीर पाठिंबा दिला होता. पण ते शब्द हवेत विरण्यापूर्वीच त्यांनी बाजू पलटली.
शरद पवार यांच्या अशा दुटप्पी व्यवहारांची आणि वर्तनाची अनेक उदाहरणे सांगता येतील. विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या प्रयत्नात सहभागी आहोत असे दाखवतानाच, उद्योगपती गौतम अदानी यांची हिंडेनबर्ग अहवाल प्रकरणात पवारांनी भलावण केली. त्यांच्या उलटसुलट विधानांनी चर्चेला उधाण आले. त्यातच पुतणे अजित पवार यांचे अचानक नॉट रिचेबल होणे आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करणे यामुळेही या चर्चेला आणखी वेग आला आणि आता पवार काका-पुतणे नव्या खेळीच्या तयारीत असल्याचे तर्क सुरू झाले आहेत.

या पाठोपाठ बातम्यांचे पेवच फुटले आहे. अजित पवार यांनी आपल्या पक्षातील 53 पैकी 40 आमदारांच्या पाठिंब्याची पत्रेच मिळवल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे. यापूर्वी अजित पवार यांनी अशी काही कृती केली, तेव्हा शरद पवार यांचा संबंधितांना तातडीने फोन जात असे आणि अजित पवार यांची मोहीम बारगळत असे. पण यावेळी मात्र अजित पवारांची धामधूम सुरू असता आणि त्यावर जाहीर चर्चा सुरू झाली असता, शरद पवार यांनी चकार शब्दही काढलेला नाही की, कोणाला फोनवर निरोपही दिलेला नाही. त्यावरून त्यांच्या मनात काय असावे, याचा सहज तर्क करता येत नाही.

महाविकास आघाडीची स्थापना होत असताना शरद पवार यांनी पद्धतशीरपणे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद दिले आणि अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रिपद आणि अर्थखाते सोपवले. उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा बिलकुल अनुभव नव्हता आणि ते म्हणावे तितके सक्रियही नव्हते. कोरोना काळात तर ते निवासस्थानातून कारभार पाहात होते. त्याचा पुरेपूर फायदा अजित पवारांनी उचलला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सर्वाधिक निधी दिला. पवारांचा हाच कित्ता भाजपने गिरवला आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद देत असताना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद आणि अर्थखाते देण्यात आले.

विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी खटपट करण्याचा आविर्भाव आणत असताना पवारांच्या मनात दुसरेच काहीतरी शिजत असावे, हे आता दिसून येऊ लागले आहे. पक्षाच्या अनेक मातब्बर नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू आहे. खुद्द अजित पवारांवर टांगती तलवार आहे. कारवायांचा धडाका सुरू राहिला तर पक्ष विकलांग होईल, हे गणित पवारांनी मांडलेच असणार. आता ईडीचा विळखा घट्ट होत जाणार, हे चाणाक्षपणाने ओळखल्यानेच शरद पवार यांनी आता वारा वाहील, तशी पाठ फिरवण्याचे धोरण अंगीकारल्याचे दिसून आले आहे.
त्यामुळेच पवारांनी आता 'नरो वा कुंजरो वा' भूमिका घेत, कोणी काही निर्णय घेतला तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असा शहाजोग पवित्रा त्यांनी धारण केल्याचे दिसते. एरव्ही पूर्वी अशा प्रसंगात, पक्षप्रमुख मी आहे, कुटुंबप्रमुख मी आहे, अशी कठोर भाषा वापरणार्‍या पवारांची भाषा आता मवाळ झाली आहे. त्यामागे पक्षाची पडझड थांबवावी, हा एक हेतू असणार हे, स्पष्टच आहे.

दुसरा खरा आणि महत्त्वाचा हेतू म्हणजे कन्या सुप्रिया सुळे यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद मिळवून देणे. अजित पवार यांना दीर्घकाळ मंत्रिपदे मिळाली. उपमुख्यमंत्रिपद मिळाले आणि संभाव्य 'नवी विटी, नवे राज्य'च्या खेळात अजित पवार मुख्यमंत्रीही होऊ शकतात. त्यामुळेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच सत्तेवर येणार, नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार, अशी शरद पवार यांची पक्की खात्री असल्यानेच, भाजपशी निकट संबंध जोडण्याचा पवारांचा मनसुबा असू शकतो. वार्‍याची दिशा ओळखण्यात ते माहीर आहेतच. त्यामुळेच शरद पवार यांनी हा नवा सारिपाट मांडला असल्यास त्यात आश्चर्य नाही.

या पार्श्वभूमीवर त्यांच्या संकेतानुसारच गेल्या काही दिवसांतच अजित पवार यांच्या पडद्याआडच्या गूढ हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. सर्वोच्च न्यायालयात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. त्याचा निकाल मे महिन्याच्या पूर्वार्धात अपेक्षित आहे. हा निकाल कदाचित प्रतिकूल लागेल, अशा आशंकेने भाजप गोटातही अस्वस्थता आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या गूढ हालचाली सुरू होताच, भाजपचे दोन नेते आशिष शेलार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्ली गाठली होती आणि पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली होती. शरद पवार यांनी दिल्लीत राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली, तेव्हा त्यांच्या समवेत नेहमी असणारे प्रफुल्ल पटेल नव्हते. अजित पवार यांच्यासाठी व्यूहरचना करण्यात ते गुंतले होते, असे सांगितले जाते. या सार्‍यांचा अर्थ, दोन अधिक दोन बरोबर चार असा होतो.

अजित पवार यांचे निकटवर्ती धनंजय मुंडे यांनी काका स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात बंड केले, तसे अजित पवार करू शकलेले नाहीत. अर्थात गोपीनाथ मुंडे म्हणजे शरद पवार नव्हेत. पवार हे मुरब्बी राजकारणी. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे त्यांना तेल लावलेला पैलवान म्हणत. ते कोणाच्या हाती सहसा लागणे कठीण. अर्थात सध्या पडद्याआडच्या ज्या घडामोडी होत आहेत, त्या त्यांच्या इशार्‍याशिवाय होणे अशक्य. एकावेळी अशा घडामोडींना किल्ली देतानाच दुसरीकडे त्याचा इन्कार करायचा, हीसुद्धा त्यांची नेहमीचीच हातोटी आहे. साहजिक त्यांच्या कोणत्याही कृतीविषयी नेहमीच साशंकता निर्माण होते. आताही तेच होत आहे.
ताज्या घडामोडीत अजित पवार यांनी वावड्या उडवू नका असे सांगत, सार्‍या घटनांमागील तर्कवितर्कांचा इन्कार केला आहे. पवार यांनीही इन्कार केला आहे तर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी अजित पवारांना दोन महिन्यांत भेटलो नसल्याचा खुलासा केला आहे. अर्थात 'बोले तैसा चाले' अशी काही राजकीय नेत्यांची ख्याती कधी नव्हती व नाही. त्यामुळेच शरद पवार हे आता कोणती खेळी करतात, याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT