नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन; भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना ट्रोल केले जात असून ट्रोलर्संना सत्ताधारी पक्षाचा पाठिंबा असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षाच्या खासदारांनी केला आहे. याबाबत ज्येष्ठ वकील आणि काँग्रेसचे खासदार विवेक के तन्खा यांच्यावतीने विरोधकांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक पत्र लिहिले आहे. भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना जे कोणी ऑनलाइन ट्रोल करत आहेत; त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी विनंती पत्रातून करण्यात आली आहे. (Maharashtra Politics)
या पत्रात असे म्हटले आहे की सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठात महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि राज्यपालांच्या भूमिकेबाबत महत्त्वाच्या घटनात्मक मुद्द्यांवर सुनावणी सुरू आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाशी हितसंबंध असलेल्या एका गटाने सरन्यायाधीशांना लक्ष्य केले आहे. "त्यांच्यावर टीका करताना वापरलेली भाषा आक्षेपार्ह आहे. हे खेदजनक आहे. हा मजकूर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाखो लोकांनी पाहिला आहे," असे पत्रात म्हटले आहे. अशा प्रकारचे ट्रोलिंग म्हणजे न्याय व्यवस्थेत हस्तक्षेप करण्यासारखे आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.
केवळ ट्रोल करणार्या व्यक्तींवरच नव्हे, तर त्यामागे असलेल्या लोकांवर म्हणजे त्यांना पाठिंबा देणार्यांवरही तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील आणि देशातील कदाचित सर्वात मोठ्या बंडामुळे निर्माण झालेले घटनात्मक पेच आणि सत्तासंघर्षावरील (Maharashtra Politics) सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठात सुनावणी पुर्ण झाली आहे. ठाकरे, शिंदे आणि राज्यपालांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर गुरूवारी घटनापीठाने निकाल राखून ठेवला. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सुनावणीत सरन्यायाधीशांनी राज्यपालांच्या अधिकारांच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.
हे ही वाचा :