मुंबई; पुढारी वृत्तसेवा : Maharashtra Politics : महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यांत 391 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी ते मे पर्यंत राज्यात 3 हजार 152 मुली आणि महिला बेपत्ता आहेत. ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाची ताकद नाही, अशाच ठिकाणी जातीय दंगली होत आहेत. जाणीवपूर्वक समाजात कटुता निर्माण होईल याची काळजी राज्यकर्त्यांकडूनच घेतली जात आहे. मणिपूरमध्ये गेल्या 45 दिवसांपासून दंगली होत आहेत. राज्यात आणि देशात चिंता वाटावी अशीच स्थिती आहे, असा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर साधला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात पवार बोलत होते. सांप्रदायिक, जातीयवादी प्रवृत्तींच्या हातात देश जाणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. देशात लोकशाहीवर विश्वास असलेल्या सर्व पक्षांना एकत्र करण्याचा आपला प्रयत्न असून येत्या 23 तारखेला पाटणा येथे सर्व पक्ष मिळून धोरण ठरविणार आहेत, असेही पवार यांनी सांगितले. राज्यात अनेक ठिकाणी जातीय दंगली झाल्या आहेत. राज्यातील ढिसाळ कायदा-सुव्यवस्था हेच याचे कारण आहे. ती चांगली नसेल तर जातीय दंगली वा इतर कारणांनी जबरदस्त किंमत द्यावी लागते, असे पवार म्हणाले. Maharashtra Politics
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदावर येताच तीन वर्षांत देशातील शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करू, असे सांगितले होते. आता नऊ-दहा वर्षे झाली तरी काय अवस्था आहे, असे सांगून शेतकर्याचे उत्पन्न दुप्पट झाले की आत्महत्या, असा सवाल शरद पवार यांनी केला. महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यांत 391 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. शेतमालाला योग्य भाव नाही. शेतकर्यांची अर्थव्यवस्था अडचणीत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
मणिपूरमध्ये गेले 45 दिवस सतत दंगली होत आहेत. एका अतिवरिष्ठ निवृत्त अधिकार्याने याबद्दल चिंता व्यक्त करताना म्हटले,मणिपूरमध्ये जे घडते आहे, त्याकडे केंद्र सरकार ज्या पद्धतीने पाहात आहे ते पाहता आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाही, याची खात्री वाटत नाही. याकडे लक्ष वेधून पवार म्हणाले, मणिपूर हे म्यानमारच्या सीमेवर आहे. चीनची सीमाही लागून आहे. या सीमाभागात अशा प्रकारची कायदा सुव्यवस्था राहिली व त्याचा गैरफायदा शेजारच्या राष्ट्राने घ्यायचा प्रयत्न केला तर काय होईल? पण त्याची दखल राज्यकर्ते घेत नाहीत, असेही पवार म्हणाले.
राष्ट्रपती, मुख्य न्यायाधीश या पदांची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. संसदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे राष्ट्रपतींना निमंत्रण दिले गेले नाही. नव्या संसदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. त्याचे उत्तर सोपे आहे. मोदींचे नाव यायचे असेल तर त्यांच्यापेक्षा प्रोटोकॉलमध्ये वरचे स्थान असलेल्यांना बोलवायचे नाही. केवळ माझे नाव हवे म्हणून राष्ट्रपतींना बोलावले नाही. ही पदे घटनात्मक आहेत. पण त्यांचे महत्त्व राखले जात नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली.
हे ही वाचा :